नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवार, 28 जानेवारी रोजी विमान अपघातातं निधन झाले. 29 जानेवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजितदादांच्या अकाली निधनाने साऱ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली. दरम्यान, विविध स्तरातून त्यांना आदरांजली अर्पित करण्यात येत आहेत. तर काही त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अशातच नागपूर येथील त्यांच्या शासकीय बंगल्याबाबतची खास आठवण तेथील अधिकारी राजेंद्र बारई यांनी सांगितली. अजित पवार यांचा नागपूरमधील शासकीय बंगला विजयगडचे अधिकारी राजेंद्र बारई म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात अजितदादा नागपूरात आल्यावर शासकीय बंगला विजयगडमधील फुले, झाडं आणि परिसराचे काढायचे. 'या वस्तू तशाच राहिल्या पाहिजे', अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यावर जाण्यापूर्वीं अजितदादांनी बंगल्यातील सगळ्या कर्मचाऱ्यांसोबत फोटो काढले. नागपुरातील अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड' मधील आजचे वातावरण भावूक आहे. अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यावर 2024 च्या हिवाळी अधिवेशनाच्या 22 दिवसांपूर्वी 'विजयगड' बंगला तयार करण्यात आला. बंगल्याची डागडुजी करताना दादांनी स्वतः काही सूचना दिल्या होत्या. बंगल्यात नीटनेटकेपणा, सोबरनेस, वायरचा एकही तुकडा दिसता कामा नये, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. तसेच बंगल्याचे बांधकाम करताना भेटायला येणाऱ्या लोकांची खास काळजी घेण्याच्या सूचनाही अजितदादांनी दिल्याचे बारई यांनी सांगितले.
हेही वाचा : Ajit Pawar Death : "मीडियाआधी ही माहिती मला समजली" अजित पवारांच्या अपघातानंतर पहिला कॉल कोणाला?