जम्मू काश्मीर: 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या दिवशी घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण देश हादरला होता. शांत, निसर्गरम्य आणि पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण असलेल्या पहलगामवर दहशतीचे सावट पसरले होते.
यानंतर पहलगाममधील परिस्थिती काही प्रमाणात सुधारत असून, येथील भीतीचे वातावरण हळूहळू कमी होत आहे. तरीही पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात पहलगामकडे पाठ फिरवली असून, पर्यटन संख्येत लक्षणीय घट झालेली दिसत आहे. अनेक हॉटेल्स, स्थानिक दुकाने, टॅक्सी चालक आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायांवर याचा परिणाम झाला आहे.
पर्यटकांमध्ये पुन्हा आकर्षण निर्माण व्हावे यासाठी ‘I Love Pahalgam’ हा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. या माध्यमातून पर्यटकांना पहलगामविषयी प्रेम आणि आपुलकी निर्माण व्हावी, असा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. तसेच, स्थानिक प्रशासनाकडून विविध पर्यटन उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आजही अनेक पर्यटक या ठिकाणी येऊन येथील निसर्गसौंदर्याचा आनंद घेत आहेत. हिरव्यागार दऱ्या, बर्फाच्छादित पर्वत, वाहणाऱ्या नद्या आणि शांत वातावरण यामुळे पहलगामचे आकर्षण अजूनही कायम आहे. जय महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधींनी पर्यटकांशी संवाद साधला असता, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असला तरी पहलगामच्या आठवणी सांगताना अनेक पर्यटक भावूक होत असल्याचे दिसून आले.
अनेक पर्यटकांनी सांगितले की, पहलगाम हे केवळ पर्यटनस्थळ नसून निसर्गाशी जवळीक साधण्याचे ठिकाण आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण मागे टाकून पुन्हा एकदा येथे पर्यटकांनी यावे, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
पर्यटकांनी पुन्हा मोठ्या प्रमाणात पहलगामला यावे यासाठी प्रशासन विविध प्रकारची काळजी घेत आहे. सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, पर्यटकांना सुरक्षित वाटावे यासाठी जागृतीही केली जात आहे. विविध ठिकाणी सुरक्षा तपासणी, पोलिसांचा बंदोबस्त आणि सीसीटीव्ही यंत्रणा वाढवण्यात आली आहे. आगामी काही दिवसांत पहलगाममधील पर्यटकांची संख्या पुन्हा वाढेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.