इस्लामाबाद: कधीकाळी भारताच्या विरोधात कारस्थानं रचण्यात मग्न असलेल्या पाकिस्तानची अवस्था आता अशी झाली आहे की, त्यांना स्वतःचे शेजारीही भाव देईनासे झाले आहेत. भारताला आपला 'शत्रु' मानणाऱ्या पाकिस्तानला आता अफगाणिस्तानने मोठा इंगा दाखवला आहे. दोन्ही देशांमधील सीमेवरील तणावाचा परिणाम असा झालाय की, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची अक्षरशः वाट लागली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, उभय देशांतील व्यापारात 53 टक्क्यांची भीषण घसरण झाली असून, पाकिस्तानी निर्यातदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
एकेकाळी जिथे भरलेल्या ट्रकांच्या रांगा लागायच्या, तिथे आता स्मशानशांतता पसरली आहे. जो व्यापार कधीकाळी 2.61 अब्ज डॉलर होता, तो आता कोलमडून थेट 594 मिलियन डॉलरवर आला आहे. पाकिस्तानातील प्रसिद्ध वर्तमानपत्र 'द नेशन'ने या आर्थिक नुकसानीवर शिक्कामोर्तब केले असून, यामुळे पाकिस्तानला दर महिन्याला सुमारे 177 मिलियन डॉलरचा (अब्जावधी भारतीय रुपये) फटका बसत आहे. पाकिस्तानने आपली एक मोठी आणि हक्काची बाजारपेठ स्वहस्ते गमावली आहे, अशी चर्चा आता जागतिक स्तरावर रंगू लागली आहे.
अफगाणिस्तान चेंबर ऑफ कॉमर्सने पाकिस्तानला आरसा दाखवताना स्पष्ट केले आहे की, नुकसान दोघांचेही होत असले तरी पाकिस्तानचा 'बॅण्ड' जास्त वाजला आहे. कारण, पाकिस्तानला मध्य आशियातील देशांपर्यंत पोहोचण्यासाठी अफगाणिस्तानचाच रस्ता लागतो. आता हा रस्ताच बंद झाल्याने पाकिस्तानच्या क्षेत्रीय व्यापाराच्या गप्पा हवेत विरल्या आहेत. भारताशी स्पर्धा करण्याच्या नादात पाकिस्तानने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे.
या संकटातून मार्ग काढण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती, मात्र नेहमीप्रमाणे पाकिस्तानने यात खो घातला. बैठका टाळणे आणि आडमुठी भूमिका घेणे यामुळे अफगाणिस्ताननेही आता पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, पाकिस्तानच्या सामानाला आता अफगाणिस्तानच्या बाजारपेठेत कोणी विचारत नाहीये. ज्या देशाला स्वतःच्या जनतेला पीठ डाळ पुरवता येत नाही, त्यांनी भारताशी पंगा घेण्यापेक्षा आपल्या शेजाऱ्यांशी संबंध सुधारले असते, तर आज ही वेळ आली नसती.
भारत आज जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करत असताना, पाकिस्तान मात्र आपल्याच कर्माने रसातळाला जात आहे. अफगाणिस्तानसारख्या देशानेही पाकिस्तानला वाळीत टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. भारताला 'दुष्मन' म्हणणाऱ्या पाकिस्तानला आता अफगाणिस्तानने घराबाहेर काढले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.