नवी मुंबई: पनवेल परिसरात नवजात अर्भक कोणीतरी फूटपाथवर सोडून गेल्याची खळबळजनक घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास पनवेल पोलीस करत आहेत. तपासादरम्यान एक बुरखा घातलेली महिला त्या परिसरात संशयास्पद फिरत असताना दिसून आली. या महिलेचा शोध लागला आहे. 24 तासात पनवेल पोलिसांनी यशस्वी कामगिरी केली आहे.
पनवेलमध्ये नवजात अर्भक रस्त्यावर सोडणाऱ्या महिलेचा शोध लागला आहे. 24 तासात पनवेल पोलिसांकडून यशस्वी कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. प्रेम प्रकरणातून प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा अधिक तपास पनवेल शहर पोलिसांकडून केला जात आहे.
हेही वाचा: मासिक पाळी वेळेत येत नाही?, मग 'या' पाच सवयी बदला
नेमकं प्रकरण काय?
पनवेल शहरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वप्नालय बालगृहाजवळ असलेल्या फुटपाथवर एका अज्ञात व्यक्तीने बास्केटमध्ये नवजात अर्भक ठेवले. त्यानंतर ती व्यक्ती फरार झाली. रात्रभर बाळ रडण्याचा आवाज येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता पनवेल परिसरातील नागरिकांनी पोलिसांना फोन केला. घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी पोलिसांनी दिली. पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर सर्वप्रथम बाळाला पनवेलमधील सिद्धी क्लिनिक येथे नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी बाळाची तपासणी केली आणि बाळ सुखरुप असल्याची खात्री करुन पोलिसांकडे दिले. सध्या पनवेल पोलिसांकडून बाळाच्या आईचा शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यावेळी एका फुटेजमध्ये बुरखा घातलेली महिला त्या परिसरात संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले आणि अखेर आज त्या महिलेचा शोध लागला आहे. पोलिसांकडून महिलेची चौकशी केली जात आहे.