अबुजा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नायजेरिया सरकारने त्यांच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव केला. मोदींना नायजेरिया सरकारने 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर' हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. नायजेरियाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे मोदी हे दुसरे परदेशी नागरिक आहेत. याआधी ब्रिटनच्या राणी दिवंगत एलिझाबेथ यांना १९६९ मध्ये हा पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत मोदींना १७ सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार मिळाले आहेत. पंतप्रधान मोदींनी नायजेरियाचा पुरस्कार भारतीयांना समर्पित केला.
मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यांतर्गत पहिल्या टप्प्यात ते नायजेरियाच्या दौऱ्यावर आहेत. नंतर ते ब्राझिलला जातील आणि सर्वात शेवटी गुयानाचा दौरा करुन मायदेशी परततील. पंतप्रधान मोदी त्यांच्या नियोजीत दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात रविवारी सकाळी अबुजा येथे पोहोचले. नायजेरियात मोदींचे जोरदार स्वागत झाले. मोदींच्या स्वागताला नायजेरियातील भारतीय वंशाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायजेरियात राहणाऱ्या मराठी नागरिकांनी मोदींचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केले.
नायजेरियात ६० हजार भारतीय वंशाचे नागरिक वास्तव्यास आहेत. हे भारतीय वंशाचे नागरिक नायजेरियाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.