Friday, February 13, 2026 10:21:16 AM

Praful Patel : दिल्लीत खलबतं! प्रफुल पटेलांनी घेतली मोदी-शाहांची भेट; राष्ट्रवादीच्या 'राष्ट्रीय अध्यक्षपदी' कोण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल पटेल यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्र भेट घेतली. ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

praful patel  दिल्लीत खलबतं प्रफुल पटेलांनी घेतली मोदी-शाहांची भेट राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण

Praful Patel Meet PM Narendra Modi : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) दिग्गज नेते आणि कार्यकारिणी अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्र भेट घेतली. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आणि सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.  त्यामुळे ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान झालेल्या या भेटीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतची किंवा आगामी संघटनात्मक फेरबदल यावर खलबते झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोदी-शाहांसोबत बंद दारामागे चर्चा
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या (NDA) खासदारांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत मोदींनी दिवंगत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, प्रफुल पटेल यांनी आधी पंतप्रधान मोदी आणि नंतर गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. प्रत्येकी सुमारे 5 ते 6 मिनिटे चाललेल्या या 'वन-टू-वन' चर्चेत नेमके काय घडले, याचा तपशील अधिकृतपणे समोर आला नसला तरी, राष्ट्रवादीच्या भविष्यातील रणनीतीवर यात शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

प्रफुल पटेल यांनी राज्यातील घडामोडींची माहिती पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दिली. तसेच, सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आणि कुटुंबाबद्दल चर्चा केली, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पटेल यांच्यासमोर याच भेटीत 'लोगों को इसमे भी राजनीति दिखती है', अशी अमित शाह यांनी सध्याच्या घटनेवर हसून प्रतिक्रिया दिल्याचेही समजत आहे. तसेच, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी लवकरच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिल्लीला भेटीला घेऊन येण्यासही सांगितल्याची माहिती मिळाली आहे.

अजित पवार हयात असताना विलीनीकरणाबाबत केंद्राने 'ग्रीन सिग्नल' दिला होता, त्यामुळे आता या प्रक्रियेला गती मिळणार की, विलीनीकरणाचा अध्याय थांबणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - Sunetra Pawar : पुणे आणि बीडच्या पालकत्वाची धुरा आता सुनेत्रा पवारांकडे; अजितदादांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल

राष्ट्रीय अध्यक्षपदाचा सस्पेन्स आणि पटेलांचे स्पष्टीकरण
अजित पवारांनंतर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, यावरून सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. स्वतः प्रफुल पटेल यांचे नाव या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात होते. मात्र, पटेलांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. "पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय माझ्याशिवाय होईल," असे विधान करत त्यांनी आपण या पदासाठी इच्छूक नसल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीर केले. पटेलांच्या या भूमिकेमुळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोपवले जाण्याचे संकेत मिळत आहेत. येत्या काही दिवसांत सुनेत्रा पवार स्वतः दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे.

विलीनीकरण की ब्रेक?
राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा असतानाच प्रफुल पटेलांनी सावध पवित्रा घेतला आहे. "विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही," असे सांगून त्यांनी तूर्तास या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच, अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत सुनेत्रा पवारांनी शपथ घेतल्यावर झालेल्या टीकेलाही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. "सुनेत्रा पवारांनी किती दिवस दुःख मानावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे," असे म्हणत पटेलांनी विरोधकांना उत्तर दिले. कठीण प्रसंगात पक्षाला स्थैर्य देण्यासाठीच सुनेत्रा पवारांनी ही मोठी जबाबदारी स्वीकारल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - NCP Politics : दिल्लीला जाणं रद्द करून पवारांची पुण्याकडे धाव! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच; अजितदादांनंतर कोणाकडे धुरा?


सम्बन्धित सामग्री