मुंबई : घर घ्यायचे असेल, कार घ्यायची असेल किंवा पर्सलन लोन (कर्ज) हवे असल्यास सिबिल स्कोअर खूप महत्त्वाचा ठरतो. तुम्हाला कर्ज देण्यासाठी बँका सर्वप्रथम अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर तपासतात. परंतू आता सिबिल स्कोअरचे महत्त्व आणखीच वाढणार आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) 1 एप्रिल 2027 पासून नवीन Expected Credit Loss (ECL) फ्रेमवर्क लागू करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन नियम लागू झाल्यानंतर कमी CIBIL स्कोअर असलेल्या लोकांसाठी कर्ज मिळवणे पूर्वीपेक्षा अधिक कठीण होऊ शकते. अशावेळी ज्या व्यक्तींचा CIBIL स्कोअर 730 पेक्षा कमी असेल त्यांनी आतापासूनच आपली क्रेडिट प्रोफाइल सुधारण्यावर भर देणे अपेक्षित आहे. आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे, आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता असणे, यावर कर्ज मंजुरी अवलंबून असणार आहे.
ECL फ्रेमवर्क अंतर्गत बँकांना संभाव्य नुकसानाचा अंदाज आधीच घेऊन त्यासाठी निधी राखून ठेवावा लागणार आहे. या प्रणालीचा उद्देश भारतीय बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत आणि सुरक्षित बनवणे हा असून यामुळे संभाव्य कर्जबुडव्यांना चाप बसणार आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना बँका अधिक जोखमीचे मानू शकतात. अशा ग्राहकांच्या कर्ज अर्जांची अधिक सखोल तपासणी केली जाऊ शकते. ग्राहकांना अतिरिक्त कागदपत्रे, हमीदार किंवा अतिरिक्त सुरक्षा देण्याची आवश्यकता भासू शकते. याचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज आणि शैक्षणिक कर्ज घेणाऱ्यांवर होऊ शकतो.
ज्या ग्राहकांचा CIBIL स्कोअर 730 किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांना कर्ज मंजुरी तुलनेने अधिक सहज मिळू शकते. चांगला क्रेडिट इतिहास असलेल्या ग्राहकांना कमी व्याजदर आणि अधिक चांगले कर्ज पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता असते. जास्त कर्ज वापरल्यासही स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कर्जाचा वापर संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे. वारंवार कर्जासाठी अर्ज केल्यास बँकांच्या नजरेत जोखीम वाढल्याचे संकेत जाऊ शकतात. तसेच, वेळोवेळी स्वतःची क्रेडिट रिपोर्ट तपासणेही आवश्यक आहे.