Republic Day Alert: प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्लीचं छावणीत रूपांतर; ‘या’ दहशतवाद्यांमुळे ड्रोन आणि स्नायपर्स तैनात; सुरक्षा व्यवस्था हाय-टेक

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी यंदा सुमारे 10000 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून, सुरक्षेच्या दृष्टीने आतापर्यंत नऊ वेळा रंगीत तालीम पूर्ण झाली आहे.

Republic Day Alert: प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्लीचं छावणीत रूपांतर;  ‘या’ दहशतवाद्यांमुळे ड्रोन आणि स्नायपर्स तैनात; सुरक्षा व्यवस्था हाय-टेक

नवी दिल्ली: 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सुरक्षेचा अभेद्य वेढा उभारण्यात आला आहे. यंदाच्या सोहळ्यासाठी दिल्ली पोलिसांनी प्रथमच 'अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट' या दहशतवादी संघटनेशी संबंधित मोहम्मद रेहान या स्थानिक दहशतवाद्याचे पोस्टर जारी केले असून, त्याच्याबद्दल माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्तव्य पथ आणि संपूर्ण नवी दिल्ली परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

कर्तव्य पथ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती देताना अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेश कुमार महला यांनी सांगितले की, दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलांचे जवान संयुक्तपणे सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. संपूर्ण परिसरावर 1000 हून अधिक हाय रिझोल्यूशन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. हे कॅमेरे प्रगत 'फेसियल रिकग्निशन सिस्टम' (FRS) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सुसज्ज आहेत, ज्यामुळे कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची तात्काळ ओळख पटवणे शक्य होईल.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी यंदा सुमारे 10000 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून, सुरक्षेच्या दृष्टीने आतापर्यंत नऊ वेळा रंगीत तालीम पूर्ण झाली आहे. हवाई हल्ल्यांचा धोका ओळखून 'अँटी-ड्रोन' युनिट्स सक्रिय करण्यात आली आहेत, तर उंच इमारतींवर स्नायपर तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, दिल्लीतील हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि भाडेकरूंच्या पडताळणीसाठी विशेष मोहीम राबवली जात असून सुरक्षेत कोणतीही कसर सोडली जाणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.

हेही वाचा: Mahapalika Mayor Aarakshan : राजकीय पक्षांची धाकधूक वाढली!; आज राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षणाची सोडत

यंदाच्या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांसाठी असलेल्या बसण्याच्या जागांना (एन्क्लोजर) देशातील प्रमुख नद्यांची नावे देण्यात आली आहेत. यामध्ये गंगा, यमुना, गोदावरी, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा यांसारख्या नद्यांच्या नावाने विभाग करण्यात आले आहेत. निमंत्रित पाहुण्यांना त्यांच्या निर्धारित आसन व्यवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी तीन स्तरांच्या कडक तपासणीतून जावे लागेल, ज्यामध्ये 'डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर' आणि इतर तांत्रिक तपासण्यांचा समावेश असेल.

मेट्रोने प्रवास करणाऱ्या पाहुण्यांच्या सुविधेसाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने विशेष सूचना जारी केल्या आहेत. बियास, ब्रह्मपुत्रा, चंबल, चिनाब, गंडक, गंगा, घाघरा, गोदावरी, सिंधू आणि झेलम या विभागांत बसणाऱ्या पाहुण्यांनी 'उद्योग भवन' मेट्रो स्टेशनवर उतरावे. तर कावेरी, कोसी, कृष्णा, महानदी, नर्मदा, पेन्नार, पेरियार, रावी, सोन, सतलज, तीस्ता, वैगई आणि यमुना या विभागांतील पाहुण्यांसाठी 'केंद्रीय सचिवालय' हे स्टेशन निश्चित करण्यात आले आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव सोहळ्याच्या ठिकाणी बॅग, ब्रीफकेस, खाण्याचे पदार्थ, मोबाईल व्यतिरिक्त इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पॉवर बँक, पाण्याच्या बाटल्या, छत्री आणि परफ्यूम नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. निमंत्रित पाहुण्यांनी त्यांच्या निमंत्रण पत्रिकेवरील सूचनांचे पालन करावे आणि केवळ नियुक्त केलेल्या मार्गांचाच वापर करावा, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.

दिल्ली पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा किंवा 112 या आपत्कालीन क्रमांकावर कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कडेकोट सुरक्षा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर यंदाचा प्रजासत्ताक दिन सुरक्षित वातावरणात साजरा करण्यासाठी संपूर्ण प्रशासन सज्ज झाले आहे.

हेही वाचा: Trump's Board of Peace: ट्रम्प यांच्या 'बोर्ड ऑफ पीस'ला आठ बड्या मुस्लिम देशांची साथ; गाझाच्या भविष्याचा निर्णय आता 'या' देशांच्या हाती?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number