किरण गोटूर, प्रतिनिधी
नाशिक : नाशिक महापालिकेची कालची महासभा पुन्हा एकदा वादळी ठरली. कुंभमेळ्याच्या कामांवरून महापालिका प्रशासनावर टीका होत असतानाच आता शहरातील पाणीप्रश्नावरून सत्ताधारी नगरसेवकांनीच आक्रमक भूमिका घेतली. विशेष म्हणजे, पाण्याचा प्रश्न मांडण्यासाठी सत्ताधारी नागरसेवकच थेट पाण्याचे हंडे आणि जार घेऊन महासभेत दाखल झाले. यावेळी उपमहापौर विलास शिंदे यांनीही प्रशासनाला धारेवर धरलं. तर नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेनंतर महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी अधिकाऱ्यांना थेट ऑक्टोबरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. तर काल उशिरापर्यंत सुरू असलेली ही महासभा पुन्हा आजदेखील सुरूच राहणार आहे.
याच महासभेत काही नगरसेवकांनी रस्त्यांच्या प्रश्नावरूनही प्रशासनाला लक्ष्य केलं. शहरातील रस्ते आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांवरून नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. नगरसेवकांच्या या रौद्र रूपानंतर महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं. ऑक्टोबरपर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश महापौरांनी दिले. प्रत्येक गोष्टीत ठेकेदार आणि व्हॉल्वमन यांच्याकडे बोट दाखवणं टाळा, अशी तंबीही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणी सोडण्याचं शास्त्रशुद्ध वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच तातडीने टँकरची संख्या वाढवून दहा दिवसांत टँकरचं नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले. तर १४ दिवसांत पर्यायी उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचेही निर्देश प्रशासनाला देण्यात आले. ऑक्टोबरनंतरही पाणीपुरवठ्यात सुधारणा दिसली नाही, तर घरबसण्याची तयारी ठेवा, अशा शब्दांत महापौरांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली. आता महापौरांच्या या आदेशानंतर प्रशासनाकडून प्रत्यक्षात किती वेगाने उपाययोजना होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.