‘समृद्धी’वरचे अपघात, वास्तवापेक्षा अपप्रचारच जास्त

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील अपघातांवरून सध्या विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, या महामार्गाच्या सुरक्षिततेबाबत नेमकं चित्र काय आहे? महाराष्ट्रातील इतर प्रमुख महामार्गांवरील आकडेवारीशी तुलना केल्यास काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. जाणून घ्या या चर्चेमागील तथ्ये आणि आकडेवारी.

‘समृद्धी’वरचे अपघात, वास्तवापेक्षा अपप्रचारच जास्त
Samruddhi Mahamarg

प्रसाद काथे 

अपघात होणे ही वास्तविक कोणत्याही महामार्गाच्या इतिहासातली एक अटळ गोष्ट आहे. महामार्ग बांधताना आणि त्यावरील वाहतूक सुरक्षित व्हावी यासाठी नियमांची आखणी करत असताना कितीही काटेकोर आणि बारकाईने विचार झाला तरी अपघातांचे प्रमाण शून्य होणे शक्य नसते. हे जगात कुणालाही, कुठेही, कधीही शक्य झालेले नाही. महाराष्ट्रात कित्येक हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचे जाळे पसरले आहे. त्यातील काही महत्त्वाच्या महामार्गांमध्ये समृद्धी महामार्गाची गणना केली जाते. हा नवा महामार्ग ज्यांच्या कार्यकाळात तयार होऊ शकला नाही त्यांच्याकडूनच या महामार्गावरील अपघातांचा प्रचार करून समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा सापळा आहे असे भासवण्यासाठी सुरु असतो.

राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांमधील अंतर अधिक वेगाने आणि सुरक्षित पार करता यावे यासाठी समृद्धी महामार्गाची आखणी व बांधणी केली गेली आहे. त्याची लांबी ७०१ किमी आहे. डिसेंबर २०२२ पासून टप्प्याटप्प्याने हा महामार्ग जनतेसाठी खुला झाला. जून २०२५ पासून तो पूर्णपणे वापरात आला. हा मार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि ठाणे अशा दहा जिल्ह्यांमधून जातो. ‘समृद्धी महामार्ग’ हा मृत्यूचा महामार्ग आहे अशा शब्दांत त्यावर टीका करत त्याची कुप्रसिद्धी करण्याचा खोडसाळपणा सध्या केला जातो आहे. त्यामागील सत्य काय आहे?

हेही वाचा- मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! समृद्धी महामार्गावर वाहतूक ब्लॉक; जाणून घ्या तारखा

राज्याची आकडेवारी
महाराष्ट्र हे रस्ते आणि महामार्गांचे सर्वांत मोठे जाळे असणारे राज्य आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील महामार्गांची लांबी खालीलप्रमाणे :

राष्ट्रीय महामार्ग (National Highways-NH) १८,०३७ किमी (भारतात पहिला क्रमांक)
राज्य महामार्ग (State Highways – SH) ३२,००० किमी
यात समृद्धी महामार्ग हा लांबीनुसार राज्यातील सगळ्यात मोठा महामार्ग आहे. डिसेंबर २०२२ मध्ये महामार्ग सुरू झाल्यापासून ऑगस्ट २०२६ पर्यन्त महामार्गावर एकूण ६३३ अपघात आणि ५७२ मृत्यू झाले. याच काळात महाराष्ट्र महामार्ग वाहतूक पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळानुसार महाराष्ट्रात जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२५ या तीन वर्षांत १,०७,८११ अपघात आणि ४६,६३० मृत्यू झाले. यावर नजर टाकल्यास समृद्धी महामार्गावर झालेल्या मृत्यूंचा वाटा २०२३ मध्ये ०.९८%, २०२४ मध्ये ०.८०% आणि २०२५ मध्ये ०.९८%. इतका अत्यल्प आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेसवे आणि समृद्धी महामार्ग
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे (यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे) हा महाराष्ट्रातील सर्वांत महत्त्वाचा आणि पहिला पूर्णपणे ‘प्रवेश-नियंत्रित’ (Access-Controlled) ६-पदरी द्रुतगती मार्ग आहे. त्याची लांबी ९४.५ किलोमीटर. एप्रिल २००२ मध्ये हा महामार्ग पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झाला. या महामार्गावर अनेकदा अपघात आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी होते.

हेही वाचा – नाशिकच्या विमानसेवेबाबत मोठी अपडेट! दिल्लीसह 4 शहरांसाठी रोज उड्डाण, पण गोव्याचा पत्ता कट?

कोणत्याही महामार्गावर अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण ‘जास्त आहे की कमी’ हे केवळ मृत किंवा अपघातांच्या एकूण संख्येवरून ठरवणे शास्त्रीयदृष्ट्या चूक असते. आंतरराष्ट्रीय रस्ते वाहतूक मानकांनुसार (उदा. IRC – Indian Roads Congress आणि WHO) कोणत्याही महामार्गाची सुरक्षितता तपासण्यासाठी जे मुद्दे निश्चित केले गेले आहेत त्यांच्या आधारे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि समृद्धी हायवे यांची तुलना करून पाहूया.

1. प्रति शंभर किलोमीटर अपघात प्रमाण
प्रत्येक महामार्गाची लांबी भिन्न असते. त्यामुळे वाहतुकीचे प्रमाणही भिन्न असते. त्यामुळे अपघात व मृत्यूचे प्रमाण लक्षात घेतानाच त्या महामार्गाची लांबी किती आहे, याचाही विचार करणे आवश्यक ठरते. उदा. ७०० किमीच्या रस्त्यावरील अपघातांची तुलना १०० किमीच्या रस्त्याशी थेट करता येत नाही. महामार्गावरील एकूण अपघातांच्या (किंवा मृत्यूंच्या) संख्येला त्या महामार्गाच्या एकूण लांबीने (किमीमध्ये) भागून, प्रति १०० किमीचा दर काढला जातो.

प्रति १०० किमी मृत्युदर = (एकूण मृत्यू / महामार्गाची लांबी (किमी)) × १००
या सूत्रानुसार पाहिल्यास २०२४ मध्ये समृद्धी महामार्गवरील (लांबी ६२५ किमी धरून) प्रति १०० किलोमीटर्स मृत्यूचे प्रमाण २०.२ इतके असून त्याच वर्षी मुंबई ते पुणे एक्सप्रेस वे चे प्रमाण ९५.२ इतके आहे; तर २०२५ मध्ये समृद्धी महामार्गावरील (लांबी सुमारे ६७० किमी धरून) २२.७ इतके आहे तर मुंबई पुणे एक्सप्रेस वे चे प्रमाण ७२.० इतके आहे.

म्हणजेच प्रति १०० किलोमीटर या निकषावर समृद्धी महामार्गावरील मृत्युदर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मृत्युदरापेक्षा बराच कमी आहे.

2. प्रतिवाहन-किलोमीटर
हा सुरक्षितता मोजण्याचा अचूक आणि आंतरराष्ट्रीय निकष आहे. यात महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एकूण वाहनांची संख्या आणि त्यांनी कापलेले अंतर (वाहतुकीची घनता) यांचा विचार केला जातो. एखादा रस्ता व्यस्त असेल (उदा. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे) आणि दुसरा रस्ता तुलनेने कमी वाहतुकीचा असेल, तर केवळ मृत्यूची संख्या न पाहता ‘किती वाहनांनी किती किमी अंतर पार केले आणि त्या तुलनेत किती अपघात झाले’ हे मोजले जाते.

या निकषाचा विचार करताना दोन्ही मार्गांसाठी कमी-वाहतूक (समृद्धी २०,००० आणि मुंबई-पुणे ६५,०००) किंवा जास्त-वाहतूक (समृद्धी २५,०००/ ३७,००० आणि मुंबई-पुणे १,००,०००) या आकड्यांचा विचार केल्यास, ते प्रमाण पुढील प्रमाणे दिसते:

२०२४ : समृद्धी २.७५ विरुद्ध ४.०० (कमी वाहतूक) आणि २.२० विरुद्ध २.६० (जास्त वाहतूक). दोन्ही परिस्थितीत समृद्धीचा दर कमी येतो.
२०२५ : समृद्धी ३.११ विरुद्ध ३.०३ (कमी वाहतूक) आणि १.६८ विरुद्ध १.९७ (जास्त वाहतूक). जवळपास समान, जास्त-वाहतूक परिस्थितीत थोडा कमी.
थोडक्यात, केवळ आकडेवारी आणि मृतांच्या संख्येवरून समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा महामार्ग आहे असा निष्कर्ष काढणे अयोग्य ठरेल. होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य अथवा प्रमाण नाकरण्याची मानसिकता यामागे नसून केवळ समृद्धी महामार्गावरच सर्वाधिक अपघात होतात असा प्रचार तथ्यहीन असल्याचे दाखवून देणे एवढाच उद्देश यामागे आहे.

कोणतेही सरकार आपल्या राज्यात महामार्ग बांधत असताना राज्याच्या वेगवान प्रगतीचा उद्देश मनात बाळगूनच करत असते. ते बांधत असताना त्यावर कमीतकमी अपघात कसे होतील याचा विचार करूनच ते बांधले जातात. अपघात आणि अपघाती मृत्यू होणे हे कोणत्याही सरकारने कधीही आणि कितीही लांब बांधलेल्या महामार्गांबाबतचे वास्तव असतेच. ते कमी कसे होतील यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असते. तशी उपाययोजना समृद्धी’वर आहे. जमल्यास वाहन चालकांनीही बेदरकारपणे वाहन चालवणे टाळले तर, अपघात टळतील.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number