मुंबई: भारतीय शेअर बाजारात आज बुधवारी, 18 मार्च 2026 रोजी आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहारदिनी सकारात्मक सुरुवात पाहायला मिळाली. प्रमुख निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 हिरव्या निशाणावर उघडले. जागतिक बाजारातील मिश्र संकेत आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांचा वाढता आत्मविश्वास यामुळे बाजारात सकाळच्या सत्रात चांगली खरेदी दिसून आली आहे.
30 समभागांचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 296.71 अंकांनी म्हणजेच सुमारे 0.39 टक्क्यांनी वाढून 76,367.55 या पातळीवर उघडला. त्याचवेळी एनएसई निफ्टी 50 निर्देशांकानेही सकारात्मक सुरुवात करत 51.75 अंकांची म्हणजे सुमारे 0.22 टक्क्यांची वाढ नोंदवली आणि तो 23,632.90 या स्तरावर उघडला. सकाळी सुमारे नऊ वाजून 20 मिनिटांपर्यंत सेन्सेक्समध्ये आणखी वाढ होत तो सुमारे 464 अंकांच्या उसळीसह 76,535 या पातळीवर व्यवहार करत होता. तर निफ्टी 50 निर्देशांक 109 अंकांनी वाढून 23,690 या पातळीवर पोहोचला होता.
बीएसईच्या समभागांमध्ये इंडिगो, टीसीएस, एचसीएल टेक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि पॉवरग्रिड हे समभाग सकाळच्या सत्रात टॉप गेनर म्हणून पुढे होते. या समभागांमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. दुसरीकडे टाटा स्टील, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या समभागांमध्ये घसरण दिसून आली आणि ते टॉप लूजर ठरले आहेत.
मंगळवारी, 17 मार्च 2026 रोजीही शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली होती. त्या दिवशी बीएसई सेन्सेक्स 567.99 अंकांनी म्हणजेच 0.75 टक्क्यांनी वाढून 76,070.84 या पातळीवर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 50 निर्देशांक 172.35 अंकांच्या वाढीसह 23,581.15 या पातळीवर स्थिरावला होता.
त्या दिवशी बीएसईच्या टॉप गेनरमध्ये एटरनल, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, एल अँड टी आणि भारती एअरटेल या समभागांचा समावेश होता. तर बजाज फायनान्स, आयटीसी, टीसीएस, अदानी पोर्ट आणि एचसीएल टेक या समभागांमध्ये घसरण दिसून आली होती.
क्षेत्रनिहाय पाहता निफ्टी 100, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी स्मॉलकॅप 100 आणि निफ्टी मिडकॅप 100 या निर्देशांकांमध्ये तेजी नोंदवली गेली. मात्र निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी आयटी क्षेत्रातील काही समभागांवर दबाव दिसून आला. मंगळवारी बीएसईच्या एकूण 30 समभागांपैकी 21 समभाग वाढीसह बंद झाले होते, तर नऊ समभागांमध्ये घसरण नोंदवली गेली होती. त्यामुळे बाजारात गुंतवणूकदारांचा सकारात्मक कल कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
Disclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र न्यूज कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!