Konkan Railway Summer Special Trains : मडगाव ते बंगळुरू आणि मडगाव ते मुंबई या मार्गांवर विशेष उन्हाळी गाड्या चालवण्याचे नियोजन कोकण रेल्वेने केले आहे. उन्हाळी सुट्ट्या, गुड फ्रायडे आणि इस्टर सणामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने या फेऱ्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, यामुळे प्रवास अधिक सुखकर होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यशवंतपूर ते मडगाव आणि बंगळुरू विशेष गाडी
बंगळुरू आणि मडगाव दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 06271 यशवंतपूर ते मडगाव ही विशेष रेल्वे 2 एप्रिल रोजी रात्री 23.55 वाजता यशवंतपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 17.30 वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 06272 मडगाव ते बेंगळुरू कॅन्टोन्मेंट ही गाडी 5 एप्रिल रोजी सकाळी 11.00 वाजता मडगाववरून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 05.20 वाजता बेंगळुरू कॅन्टोन्मेंटला पोहोचेल. या प्रवासात ही गाडी कुणिगल, हासन, मंगळुरू (बंतवाला), उडुपी, कुंदापुरा, मुरुडेश्वर, कारवार आणि काणकोण अशा महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल.
हेही वाचा - Ratnagiri Passenger Train: कोकणवासीयांनो लक्ष द्या! दादर-रत्नागिरी पॅसेंजरचे 'टर्मिनस' बदलले; आता दादर नाही तर 'या' स्थानकावरून सुटणार गाडी
मुंबई ते मडगाव उन्हाळी विशेष गाड्यांचे नियोजन
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मुंबई CSMT ते मडगाव दरम्यान उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 01019 मुंबई ते मडगाव ही गाडी 5 एप्रिल ते 7 जून या कालावधीत दर रविवारी धावणार आहे. ही गाडी मुंबईहून पहाटे 00.55 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 15.15 वाजता मडगावला पोहोचेल. तसेच परतीसाठी गाडी क्रमांक 01020 मडगाव ते मुंबई ही याच कालावधीत दर रविवारी सायंकाळी 16.00 वाजता मडगाववरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 03.50 वाजता मुंबईत दाखल होईल.
प्रवाशांसाठी महत्त्वाचे थांबे
मुंबई-मडगाव विशेष गाडीला कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. यामध्ये दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी आणि करमळी या स्थानकांचा समावेश आहे. या विशेष गाड्यांमुळे सुट्ट्यांच्या काळात होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा - Boys Fight on Train Track : मुलीवरून राडा! स्थानकातील रेल्वे ट्रॅकवर दोन तरुणांची हाणामारी; समोरून ट्रेन.. अन्..