मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी या दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होऊन 18 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. त्याचप्रमाणे दहावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होऊन 18 मार्च 2026 रोजी संपणार आहे.
बारावीच्या प्रायोगिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यांकन परीक्षा 23 जानेवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. या काळात विज्ञान शाखेच्या प्रायोगिक परीक्षा, वाणिज्य शाखेतील प्रोजेक्ट मूल्यांकन आणि कला शाखेतील तोंडी परीक्षा पूर्ण करण्यात येतील. दहावीच्या प्रायोगिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यांकन परीक्षा 2 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडतील.
हेही वाचा: CBSE Board Exam 2026: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! CBSE बोर्डाकडून 10वी आणि 12वीचे अंतिम वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधीपासून सुरू होणार परीक्षा
दरम्यान शारीरिक शिक्षण, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र अंतर्गत आणि कला विषयांच्या मूल्यांकन परीक्षा शाळास्तरावर घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्यानुसार तयारी करून वेळेचे नियोजन करावे, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे. विषयवार वेळापत्रक आणि सूचना मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर पाहता येतील, अशी माहिती मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी दिली.
राज्य मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी नोंदणी अर्ज क्रमांक 17 सादर करण्यासंदर्भात महत्त्वाची सूचना जारी केली आहे. अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याचा कालावधी आज 1 नोव्हेंबर 2025 ते 31 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. अतिविलंब शुल्क म्हणून प्रति विद्यार्थी प्रति दिवस 20 रुपये आकारण्यात येणार आहे. या कालावधीनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीनेच करावी लागेल. यासाठी www.mahahsscboard.in या वेबसाइटवर आवश्यक सर्व सूचना उपलब्ध करून दिल्या आहेत, असे माळी यांनी परिपत्रकात म्हटले आहे.