Friday, March 13, 2026 07:43:29 AM

Chandoli : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 'सुभेदार' परतला! ‘चंदा-सेनापती’च्या संसारात तिसऱ्याची 'एन्ट्री'; आता वर्चस्वासाठी सेनापतीशी भिडणार?

आधीच सेनापती आणि चंदाने आपली हद्द निश्चित केली असताना, सुभेदार तिथे आपली स्वतंत्र जागा निर्माण करणार की सेनापतीशी भिडणार, याकडे अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.

chandoli  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सुभेदार परतला ‘चंदा-सेनापती’च्या संसारात तिसऱ्याची एन्ट्री आता वर्चस्वासाठी सेनापतीशी भिडणार

Chandoli Wild Life and Sahyadri Tiger Reserve : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात सध्या वाघांच्या हालचालींनी वन्यजीव प्रेमी आणि अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले आहे. राधानगरी ते चांदोली असा सुमारे 250 किलोमीटरचा थरारक प्रवास करून 'सुभेदार' (STR-T) हा नर वाघ पुन्हा आपल्या मूळ अधिवासात परतला आहे. अवघ्या दीड महिन्यात पार केलेला हा पल्ला वाघांच्या स्थलांतराचा एक महत्त्वाचा पुरावा मानला जात असून, यामुळे सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघांचे वर्चस्व अधिक घट्ट होताना दिसत आहे.

सुभेदारचा विक्रमी प्रवास आणि ओळख
'सुभेदार' हा वाघ पहिल्यांदा 23 एप्रिल 2022 रोजी राधानगरी अभयारण्यात दिसून आला होता. त्यानंतर 28 ऑक्टोबर 2024 रोजी त्याने प्रथमच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हजेरी लावली. जानेवारी 2026 मध्ये तो पुन्हा राधानगरीत कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाला होता. मात्र, महिनाभर तिथे मुक्काम केल्यानंतर त्याने पुन्हा आपल्या मूळ क्षेत्राकडे म्हणजेच चांदोलीकडे कूच केली. राधानगरी ते चांदोली हे सरळरेषेतील अंतर 100 किमी असले तरी, डोंगराळ भाग आणि अडथळे पार करत त्याने 250 किमीचे अंतर कापले आहे. त्याच्या अंगावरील पट्टेरी रचनेवरून (STR-T) वनविभागाने त्याची ओळख पटवली आहे.

हेही वाचा - Viral Video: जंगलातील अविस्मरणीय क्षण! काळा बिबट्या आणि बिबट्या एकाच पाणवठ्यावर शांतपणे पाणी पिताना कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ तुफान व्हायरल

चंदा आणि सेनापतीचा 'सुखी संसार'
सुभेदार परतला असतानाच, चांदोलीत ताडोबातून आलेल्या 'चंदा' (STR-04) आणि तिथला जुना नर वाघ 'सेनापती' (STR-01) यांच्या जोडीची सध्या मोठी चर्चा आहे. गेल्या महिनाभरापासून हे दोन्ही वाघ एकत्र वावरत असल्याचे कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसून आले आहे. वनविभागाच्या निरीक्षणांनुसार, चंदा आणि सेनापती यांच्यात मिलन झाले असण्याची दाट शक्यता असून, लवकरच सह्याद्रीत बछड्यांचे म्हणजेच 'नव्या पाहुण्यांचे' आगमन होऊ शकते. चंदाच्या शारीरिक स्थितीत होत असलेले बदल या शक्यतेला अधिक बळ देत आहेत.

वर्चस्वाचा संघर्ष आणि वनविभागाची उत्सुकता
आता सुभेदारच्या पुनरागमनामुळे चांदोलीच्या जंगलात 'वर्चस्वाचा संघर्ष' पेटण्याची चिन्हे आहेत. आधीच सेनापती आणि चंदाने आपली हद्द निश्चित केली असताना, सुभेदार तिथे आपली स्वतंत्र जागा निर्माण करणार की सेनापतीशी भिडणार, याकडे अभ्यासकांचे लक्ष लागले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, या तिन्ही वाघांच्या हालचालींवर सीसीटीव्ही (CCTV) आणि कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून बारीक लक्ष ठेवले जात आहे.

हेही वाचा - Tadoba Tiger Reserve : ताडोबात उन्हाळ्याची चाहूल! सफारीच्या वेळेत बदल; पर्यटकांना नव्या वेळा नोंदवून घेण्याचे आवाहन


सम्बन्धित सामग्री