CBSE 12th Result 2026: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता 12 वीच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी अंतिम टप्प्यात असून, निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर आपली गुणपत्रिका पाहता येईल. यंदा CBSE ने 17 फेब्रुवारी ते 10 एप्रिल या कालावधीत इयत्ता 12 वीच्या परीक्षा घेतल्या होत्या. परीक्षा संपल्यापासून विद्यार्थी आणि पालक निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
निकाल कधी जाहीर होणार?
CBSE बोर्डाने 15 एप्रिल रोजी इयत्ता 10 वीचा निकाल आधीच घोषित केला आहे, त्यामुळे आता सर्वांचे लक्ष 12 वीच्या निकालाकडे लागले आहे. ताज्या माहितीनुसार, इयत्ता 12 वीचे निकाल एप्रिलच्या चौथ्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रसिद्ध केले जाऊ शकतात. मात्र, बोर्डाकडून अद्याप निकालाची निश्चित तारीख आणि वेळ अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.
निकाल कुठे आणि कसा तपासायचा?
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी results.cbse.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले गुण पाहू शकतात. निकाल तपासण्यासाठी खालील प्रक्रिया फॉलो करावी लागेल:
– सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ results.cbse.nic.in ला भेट द्या.
– मुख्य पृष्ठावर 'CBSE Class 12 Result' संबंधित लिंकवर क्लिक करा.
– तुमचा रोल नंबर (Roll Number), शाळेचा क्रमांक (School Number) आणि प्रवेशपत्र आयडी (Admit Card ID) अचूक भरा.
– माहिती भरल्यानंतर 'Submit' बटणावर क्लिक करा.
– तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल, तो तुम्ही डाऊनलोड करून प्रिंट काढू शकता.
हेही वाचा – Maharashtra Govt Job: विद्यार्थ्यांची 6 वर्षांची मेहनत वाया गेली, सरकारने अचानक रद्द केली 'या' पदाची भरती
डिजिलॉकर आणि इतर पर्याय
संकेतस्थळाव्यतिरिक्त विद्यार्थी डिजिलॉकर (DigiLocker) आणि उमंग (UMANG) ॲपच्या माध्यमातूनही आपली डिजिटल गुणपत्रिका मिळवू शकतील. विद्यार्थ्यांनी निकालाच्या अधिकृत अपडेट्ससाठी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगामी उच्च शिक्षणासाठी 12 वीचा निकाल अत्यंत महत्त्वाचा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये सध्या उत्सुकतेचे वातावरण आहे.