संतोष खताळ, प्रतिनिधी
चांदवड : ज्या वयात हाताला काम मिळवून आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फेडायचे, त्या वयात 19 व्या वर्षी एका तरुणाचा संशयाच्या आगीत कोळसा व्हावा, यापेक्षा दुर्दैवी काय असू शकते? नाशिक जिल्ह्यातील चांदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळेगाव रोही येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. "तुझं माझ्या मैत्रिणीसोबत प्रेमप्रकरण आहे," या संशयापोटी दोन नराधमांनी एका निष्पाप, हसत्या खेळत्या तरुणाचा घात केला. त्याला खोटं सांगून शेतात बोलावले आणि थेट विहिरीच्या खोल पाण्यात ढकलून त्याचा जीव घेतला. शरद अशोक वाकचौरे (वय 19) असं मृत तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी चांदवड पोलिसांनी रोशन तुकाराम वाकचौरे (वय 27) आणि सचिन दत्तात्रय गाडे (वय 23) या दोन्ही मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
21 मे 2026 च्या रात्री शरदला जराही अंदाज नव्हता की त्याचा विश्वासच त्याचा काळ ठरणार आहे. आरोपी रोशनच्या मनात शरदबद्दल संशयाची विषवल्ली उगवली होती. शरदचा कायमचा काटा काढण्यासाठी रोशनने त्याचा मित्र सचिन गाडे याच्यासोबत एक क्रूर डाव रचला."लक्ष्मण पानसरे यांच्या शेतात ट्रॅक्टरचे डिझेल संपले आहे, जरा डिझेल घेऊन ये," असा निरोप त्यांनी शरदला दिला. गावातीलच ओळखीचे लोक असल्याने, कोणतीही शंका न बाळगता शरद डिझेल घेऊन शेताकडे निघाला. शरद शेतात पोहोचताच त्या ठिकाणी बसलेल्या रोशन आणि सचिनने त्याला गाठले. काही समजण्याच्या आतच, दोघांनी आपली पूर्ण ताकद लावून शरदला उचलले आणि अमोल पानसरे यांच्या विहिरीतील खोल पाण्यात फेकून दिले. विहिरीच्या त्या अथांग आणि काळोख्या पाण्यात शरद जीव वाचवण्यासाठी हातपाय मारत होता, वाचवण्याची आळवणी करत होता. पण वर उभे असलेल्या नराधमांचे काळीज पाझरले नाही. अखेर पाण्यात गुदमरून, अत्यंत वेदनादायक अवस्थेत या कोवळ्या जिवाची प्राणज्योत मालवली. आपला मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने आणि नंतर त्याचा मृतदेहच हाती आल्याने वाकचौरे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. शरदचे वडील अशोक शिवाजी वाकचौरे (वय 49) यांनी हंबरडा फोडत चांदवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन व पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि दोन्ही नराधमांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींवर BNS कलम 103(1), 3(5) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.