Aadhar Card Update: आधार अपडेटची काळजी विसरा; चॅटबॉट ‘उदय’ देणार तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

चॅटबॉट स्वरूपातील ‘उदय’ नागरिकांना आधार अपडेट, शुल्क आणि जवळच्या केंद्रांची माहिती सोप्या भाषेत देणार असून, डिजिटल साक्षरतेकडे नेणारे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Aadhar Card Update: आधार अपडेटची काळजी विसरा; चॅटबॉट ‘उदय’ देणार तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

नवी दिल्ली: आधार कार्डशी संबंधित काम म्हटलं की अनेकदा तांत्रिक शब्द आणि प्रक्रियेमुळे गोंधळ उडतो. पण आता तुमची ही चिंता दूर होणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ( Unique Identification Authority of India, UIDAI) सर्वसामान्यांच्या मदतीसाठी 'उदय' (Aadhaar Mascot Uday) नावाचा एक नवा मित्र समोर आणला आहे. हा केवळ एक शुभंकर नसून, आधार सेवा अधिक सोप्या आणि सुलभ पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणारा दुवा ठरणार आहे.

या 'उदय' नेमका उदय कसा झाला? याची कथाही तितकीच रंजक आहे. केंद्र सरकारच्या MyGov प्लॅटफॉर्मवर एक देशव्यापी 'डिझाइन आणि नामकरण' स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण भारतातून आलेल्या हजारो अर्जांमधून, केरळमधील त्रिशूरचे अरुण गोकुळ यांनी साकारलेले डिझाइन आणि भोपाळच्या रिया जैन यांनी सुचवलेले 'उदय' हे नाव अंतिम करण्यात आले. लोकसहभागातून आकाराला आलेला हा शुभंकर खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधित्व करतो.

केवळ चित्र म्हणून न राहता, 'उदय' एका प्रगत चॅटबॉटच्या स्वरूपात तुमच्या सेवेत हजर असेल. आधार अपडेट कसे करावे? कोणत्या सेवेसाठी किती शुल्क लागते? किंवा जवळचे आधार केंद्र कुठे आहे? अशा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे हा चॅटबॉट अगदी सोप्या भाषेत देईल. माहितीचा अथांग साठा आता एका क्लिकवर आणि रंजक स्वरूपात उपलब्ध करून देणे, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे.

हेही वाचा: Uddhav-Raj Thackeray Interview: "मुंबईची भाषा गुजराती-हिंदी म्हणणं म्हणजे आमची संस्कृती संपवण्याचा डाव" उद्धव ठाकरेंचा एल्गार

तिरुवनंतपुरम येथे झालेल्या एका विशेष सोहळ्यात UIDAI चे अध्यक्ष नीलकंठ मिश्रा यांच्या हस्ते या शुभंकराचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, एक अब्जाहून अधिक भारतीयांसाठी आधार संवाद अधिक समावेशक आणि संबंधित बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे तांत्रिक माहितीचा अडथळा दूर होऊन, अगदी ग्रामीण भागातील व्यक्तीलाही आधार सेवा सहज समजतील.

या स्पर्धेत महाराष्ट्राचाही डंका पाहायला मिळाला. पुण्यातील इद्रिस दवाईवाला यांनी डिझाइन आणि नामकरण अशा दोन्ही श्रेणींमध्ये दुसरे स्थान पटकावून राज्याचा नावलौकिक वाढवला. या स्पर्धेत उत्तर प्रदेशातील कृष्णा शर्मा आणि हैदराबादच्या महाराज सरन चेल्लापिल्ला यांनीही यश संपादन केले. सर्व विजेत्यांचा सन्मान करून UIDAI ने कल्पकतेला दाद दिली आहे.

थोडक्यात सांगायचे तर, 'उदय'च्या आगमनामुळे आता आधारशी संबंधित माहिती घेणे कंटाळवाणे नसून अधिक सोयीचे (User-friendly) होणार आहे. डिजिटल साक्षरतेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल भविष्यात प्रत्येक नागरिकासाठी 'आधार'वड ठरेल, यात शंका नाही.

हेही वाचा: Uddhav-Raj Thackeray Interview: "…त्यावेळेस मोदींना वाचवणारे बाळासाहेब ठाकरे होते" मराठी-हिंदू विषयावरून उद्धव ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number