PM Modi On Energy Crisis: पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. हैदराबाद येथे 9,377 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना त्यांनी सर्व नागरिकांना पेट्रोलियम उत्पादनांचा वापर संयमाने करण्याचे आवाहन केले. भारत मोठ्या प्रमाणावर इंधनाची आयात करत असल्याने, पेट्रोल, डिझेल आणि वायूचा वापर अत्यंत विचारपूर्वक करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आयातीवरील अवलंबित्व आणि युद्धाचे दुष्परिणाम
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आजची गरज अशी आहे की आपण इंधनाचा वापर केवळ गरजेनुसारच केला पाहिजे. यामुळे केवळ परकीय चलनाची बचतच होणार नाही, तर युद्धाच्या जागतिक दुष्परिणामांचा भारतावर होणारा प्रभाव कमी करण्यासही मदत होईल." अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे उद्भवलेल्या जागतिक ऊर्जा संकटाच्या काळात भारताची ऊर्जा सुरक्षा अबाधित राखण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताच्या ऊर्जा धोरणाबद्दल माहिती देताना पंतप्रधानांनी सांगितले की, भारत आता सौर ऊर्जा उत्पादनाच्या बाबतीत जगातील आघाडीच्या राष्ट्रांमध्ये सामील झाला आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला दिलेल्या प्रोत्साहनामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे. सरकार आता प्रत्येक घरापर्यंत परवडणाऱ्या दरातील पाईप गॅस (PNG) पोहोचवण्यासाठी आणि CNG आधारित परिसंस्थेला बळकट करण्यासाठी वेगाने काम करत आहे.
तेलंगणामध्ये 9,377 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण
हैदराबादमध्ये झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांनी अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये हैदराबाद-पणजी आर्थिक कॉरिडॉरचा भाग असलेल्या राष्ट्रीय महामार्ग-167 चे चौपदरीकरण आणि जहीराबाद औद्योगिक क्षेत्राच्या विकासाचा समावेश आहे. तसेच, काझीपेठ-विजयवाडा रेल्वे बहु-मार्गीकरण, हैदराबादमधील 'ग्रीनफील्ड' पेट्रोलियम टर्मिनल आणि वारंगल येथील 'पीएम मित्र पार्क' (काकतिया मेगा टेक्स्टाईल पार्क) यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे त्यांनी लोकार्पण केले.
हेही वाचा - PM Modi Security Breach: बंगळुरूमध्ये पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रम स्थळाजवळ आढळली स्फोटकं; सुरक्षा यंत्रणा हाय-अलर्टवर
'5F' संकल्पनेतून वस्त्रोद्योगाला नवी दिशा
सुमारे 1,700 कोटी खर्चून उभारण्यात आलेले 'काकतिया मेगा टेक्स्टाईल पार्क' हे देशातील पहिले पूर्णपणे कार्यान्वित झालेले 'पीएम मित्र पार्क' ठरले आहे. केंद्र सरकारच्या "Farm to Fibre to Factory to Fashion to Foreign" (5F) या संकल्पनेतून हे पार्क विकसित करण्यात आले आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांपासून ते परदेशी निर्यातीपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी बळकट होणार असून, स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.