Deoria Boy steals Jewellery to buy Momos : जिभेचे चोचले पुरवण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, याचा प्रत्यय एका 14 वर्षीय मुलाच्या कृत्यावरून आला आहे. मोमोज खाण्याच्या तीव्र व्यसनामुळे या अल्पवयीन मुलाने चक्क स्वतःच्याच घरात डल्ला मारला आणि लाखोंचे दागिने मोमोज विक्रेत्याच्या स्वाधीन केले. यावरून, शाळकरी मुलांना फास्ट फूडचे लागलेले व्यसन आणि या व्यसनाने धारण केलेले भयावह रूपही या घटनेतून समोर येत आहे.
अल्पवयीन मुलाचा अजब कारनामा
उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातून ही चकित करणारी आणि तेवढीच गंभीर घटना समोर आली आहे. देवरिया जिल्ह्यातील रामपूर कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाला 'स्ट्रीट फूड', विशेषतः मोमोजचे प्रचंड वेड जडले होते. हे वेड इतके टोकाचे होते की, घरातून पैसे मिळेनासे झाल्यावर त्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने गुपचूप चोरण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे, हा मुलगा रामपूर शहरातील एका मोमोज विक्रेत्याकडे जायचा आणि मोमोजच्या बदल्यात त्याला सोन्याचे दागिने द्यायचा. काही रुपयांच्या मोमोजसाठी हा मुलगा स्वतःच्याच कुटुंबाचे लाखोंचे नुकसान करत होता. मात्र, याचे त्याला काहीही गांभीर्य नव्हते.
हेही वाचा - Liquor Smuggling Case: रेल्वेतून दारू तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; मोठ्या प्रमाणात साठा आणि रोख रक्कम पोलिसांकडून जप्त
मावशीच्या एका भेटीने फुटलं भांडं
हा चोरीचा प्रकार बराच काळ सुरू होता, मात्र कोणालाही संशय आला नाही. जेव्हा मुलाची मावशी तिचे दागिने नेण्यासाठी माहेरी आली आणि तिने कपाट उघडले, तेव्हा सगळे दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. हे पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. सुरुवातीला घरात चोरी झाल्याचा संशय होता. पण जेव्हा मुलाची कडक चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याने सर्व सत्य ओकून टाकले. त्याने कबूल केले की, मोमोज खाण्याच्या नादात त्याने हळूहळू घरातील दागिने त्या विक्रेत्याला दिले आहेत.
विक्रेत्याकडून मुलाच्या निरागसतेचा फायदा
या प्रकरणात पोलिसांनी मोमोज विक्रेत्याच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अवघ्या काही रुपयांच्या खाद्याच्या बदल्यात सोन्याचे दागिने घेणारा तो विक्रेता मुलाच्या निरागसतेचा आणि त्याच्या व्यसनाचा गैरफायदा घेत होता. या मुलाचे वडील वाराणसीत मंदिराचे पुजारी आहेत. त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात लेखित तक्रार दाखल केली आहे. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे 85 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत असून, पोलिसांनी आता त्या विक्रेत्याचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. दरम्यान, या सर्व प्रकारातून असे पदार्थ विकणारे विक्रेतेही या मुलांना नादी लावून त्यांच्या पालकांना लुटण्याच्या संधीचा लाभ पुरेपूर उचलत आहेत, ही संतापजनक बाबही समोर आली आहे.
हेही वाचा - Sadhvi Prem Baisa Death : साध्वी प्रेम बाईसांच्या मृत्यूचं गूढ उलगडणार? 'त्या' दोन इंजेक्शनबाबत धक्कादायक खुलासा