मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना कधी आणि केव्हा खेळणार? असा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून उपस्थित केला जातोय. आता या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ मिळालं आहे. रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर (ICC Champions Trophy 2025) आतंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करु शकतो. ११ जानेवारीला बीसीसीआयची (BCCI) एक बैठक पार पडली. या बैठकीत कर्णधार रोहित शर्मानेही सहभाग घेतला होता. या बैठकीत असा निर्णय घेण्यात आलाय की, जोपर्यंत संघाला नवा कर्णधार मिळत नाही, तोपर्यंत रोहित कर्णधार राहणार.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा इंग्लंड (England) दौऱ्यावर जाणार नाहीये. तो चॅम्पियन्स ट्रॉफी संपताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणार आहे. हे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचे हंगाम असणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोलायचं झालं, तर या स्पर्धेत भारतीय संघाला साखळी फेरीतील ३ सामने खेळायचे आहेत. साखळी फेरीतील शेवटचा सामना २ मार्चला खेळला जाणार आहे. भारतीय संघ जर साखळी फेरीतून बाहेर झाला, तर २ मार्च हा रोहितच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा दिवस असेल. जर भारतीय संघ सेमीफायनल पोहोचला आणि पराभूत झाला, तर ४ मार्च हा रोहितच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. जर भारतीय संघाने या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला, तर ९ मार्च हा रोहितच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा दिवस असू शकतो.
चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्यानंतर भारतीय खेळाडू आयपीएल (IPL) खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघासमोरील सर्वात मोठं आव्हान म्हणजे,इंग्लंडचा दौरा. मात्र रोहित इंग्लंड दौऱ्यावर जाणार नाहीये. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पुढील वनडे वर्ल्डकप स्पर्धा २०२७ मध्ये (ICC World Cup 2027) होणार आहे. तोपर्यंत रोहित ४० पार असेल. त्यामुळे रोहितला ही स्पर्धा खेळण्याची संधी मिळणं खूप कठीण आहे. त्यामुळे रोहितकडे निवृत्तीशिवाय पर्याय नाही.