Saturday, February 08, 2025 05:22:59 PM

WARDHA WILDLIFE NEWS
बोर व्याघ्र प्रकल्पात वाघ सुरक्षित, पण बिबट्यांची घटती संख्या चिंताजनक

टायगर सुरक्षित; बिबटांची संख्या चिंताजनकवर्धा जिल्ह्यात वन्यजीवांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलेबोर व्याघ्र प्रकल्पासाठी एकसंघ नियंत्रण फायद्याचे

बोर व्याघ्र प्रकल्पात वाघ सुरक्षित पण बिबट्यांची घटती संख्या चिंताजनक

टायगर सुरक्षित; पण बारा बिबटे दगावले
प्रमोद पाणबुडे प्रतिनिधी वर्धा : जिल्ह्यातील प्रादेशिक वनक्षेत्र आणि बोर व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघ, बिबट्या, अस्वल अशा अनेक वन्यजीवांचा मुक्त संचार आढळतो. बोर व्याघ्र प्रकल्प हा देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प असून तो वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात स्थित आहे. वाघांच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पात मागील दोन वर्षांत एकाही वाघाचा मृत्यू झाला नसला, तरी बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. प्रशासनाच्या नोंदीनुसार या कालावधीत बारा बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.

पाहुणे वाघांचा वर्धा प्रवास
वर्धा जिल्हा हा पाहुण्या वाघांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांतून बाहेर पडलेले वाघ नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ वर्ध्यातून प्रवास करतात. उदाहरणार्थ, चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या एका पट्टेदार वाघाने वर्ध्यातून 500 किमीचा प्रवास करीत मेळघाट गाठले. तर नागपूर जिल्ह्याच्या सिर्सी भागातून आलेल्या पाहुण्या वाघाने वर्ध्यातून यवतमाळमार्गे आंध्रप्रदेशच्या सीमेपर्यंत प्रवास केला. वन्यजीव अभ्यासकांच्या मते, वर्धा जिल्हा पाहुण्या वाघांसाठी पसंतीचा मार्ग ठरला आहे.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

बोर व्याघ्र प्रकल्पाची भूमिका
बोर व्याघ्र प्रकल्पात सध्या 17 प्रौढ वाघ वास्तव्य करत आहेत. प्रादेशिक वनविभागाच्या कार्यक्षेत्रातही वाघांची हालचाल सातत्याने पाहायला मिळते. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी विशेष समन्वयाने काम करत आहेत.

वन्यजीव मृत्यूचे कारण
एप्रिल 2023 पासून आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात 22 वन्यजीव मृत्यू पावले आहेत. यामध्ये बारा बिबट, तीन हरिण, तीन घोरपड, आणि दोन मोरांचा समावेश आहे. या मृत्यूंच्या कारणांमध्ये शिकारी, नैसर्गिक कारणे, आणि अपघाती घटना यांचा समावेश आहे. प्रशासनाने या घटनांची नोंद घेतली असून, त्यावर उपाययोजना आखल्या जात आहेत.

एकसंघ नियंत्रणाचे फायदे
बोर व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्र 13,800 हेक्टर असून बफर क्षेत्र 67,814.46 हेक्टर आहे. पूर्वी प्रादेशिक वनविभागाकडे असलेल्या बफर क्षेत्राचे नियंत्रण आता बोर व्याघ्र प्रकल्पाकडे देण्यात आले आहे. या एकसंघ नियंत्रणामुळे मानव-वन्यजीव संघर्ष होऊ नये म्हणून वेळीच ठोस निर्णय घेणे शक्य झाले आहे.

लिंगनिहाय बिबट मृत्यूंचे तपशील
मादी बिबट: 06
नर बिबट: 06


दगावलेल्या वन्यजीवांची स्थिती
बिबट: 12
हरिण: 03
घोरपड: 03
मोर: 02

वर्धा जिल्ह्यात वन्यजीव संवर्धनासाठी बोर व्याघ्र प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावत असला, तरी बिबट्यांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. वनविभाग आणि प्रशासनाने घेतलेल्या उपाययोजनांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी पुढील काळात ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

👉👉 हे देखील वाचा : सैफ अली खानच्या संदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट आली समोर

 


सम्बन्धित सामग्री