PIB Fact Check: 500 रुपयांच्या नोटा लवकरच चलनातून बाद होणार, अशा आशयाची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरत आहे. मार्च 2026 पर्यंत रिझर्व्ह बँक (RBI) या नोटा बंद करणार असल्याचा दावा या पोस्टमध्ये केला जात आहे. मात्र, केंद्र सरकारने या बातम्यांचा तीव्र शब्दांत निषेध करत हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने या व्हायरल मेसेजची गंभीर दखल घेत 'फॅक्ट-चेक' रिपोर्ट जारी केला आहे. यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेने 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मार्च 2026 पर्यंत 500 च्या नोटा बंद होणार ही बातमी निराधार असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पीआयबीने त्यांच्या अधिकृत 'X' हँडलवरून केले आहे. 500 रुपयांच्या नोटा आजही पूर्णपणे वैध असून त्या व्यवहारासाठी बिनधास्त वापरल्या जाऊ शकतात.
हेही वाचा – केंद्र सरकारची एलॉन मस्क यांच्या 'X' प्लॅटफॉर्मला नोटीस, 'Grok AI' चा गैरवापर, कोणत्या प्रकरणात कारवाई?
संसदेतही देण्यात आले होते स्पष्टीकरण
केवळ सोशल मीडियाच नव्हे, तर संसदेतही या विषयावर चर्चा झाली होती. ऑगस्ट महिन्यात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले होते की, सरकारची 500 रुपयांच्या नोटांचा पुरवठा बंद करण्याची कोणतीही योजना नाही. एटीएममधून 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहतील, असेही त्यांनी नमूद केले होते. दरम्यान, 500 च्या नोटांबाबत अशा अफवा पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जून महिन्यातही एका यूट्यूब चॅनलवरून असाच दिशाभूल करणारा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता, ज्याचे सरकारने वेळीच खंडन केले होते. रिझर्व्ह बँक जेव्हा कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेते, तेव्हा त्याची अधिकृत घोषणा केली जाते.
नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना
कोणतीही खळबळजनक बातमी किंवा मेसेज पुढे (Forward) करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे. अधिकृत माहितीसाठी नेहमी RBI किंवा PIB च्या वेबसाईटला भेट द्या. सध्या चलनात असलेल्या 500 च्या नोटांबाबत कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही.