Thursday, February 12, 2026 02:46:20 PM

Jilha Parishad Election 2026 : 'शौचालय' नसेल तर उमेदवारी रद्द! सर्वोच्च न्यायालयाचा 15 फेब्रुवारीचा अल्टिमेटम

निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाची अट घातली आहे. जर एखाद्या उमेदवाराच्या घरी शौचालय नसेल किंवा तो त्याचा वापर करत नसेल, तर..

jilha parishad election 2026  शौचालय नसेल तर उमेदवारी रद्द सर्वोच्च न्यायालयाचा 15 फेब्रुवारीचा अल्टिमेटम

Jilha Parishad Election 2026 : महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सर्वोच्च न्यायालयाने 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे कडक आदेश दिले आहेत. या आदेशामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मात्र, निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाची अट घातली आहे. जर एखाद्या उमेदवाराच्या घरी शौचालय नसेल किंवा तो त्याचा वापर करत नसेल, तर त्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार नाही.

उमेदवारी अर्जासोबत 'स्वयंप्रमाणपत्र' अनिवार्य
ग्रामीण भागाला हागणदारी मुक्त करण्याच्या मोहिमेला बळ देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आपल्या अर्जासोबत घरी शौचालय असल्याचे आणि त्याचा नियमित वापर होत असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र किंवा 'स्वयंप्रमाणपत्र' जोडावे लागणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य हे समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती मानले जातात; त्यामुळे त्यांनी स्वतः या मोहिमेचे आदर्श बनणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांकडे हे प्रमाणपत्र नसेल, त्यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत बाद केला जाईल.

आरक्षणाचा पेच आणि 50 टक्क्यांची मर्यादा
राज्यातील 32 जिल्हा परिषदांपैकी 12 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या आत आहे, तिथे पहिल्या टप्प्यात निवडणुका होतील. उर्वरित 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाने ही मर्यादा ओलांडल्यामुळे तिथे कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाली होती. ओबीसी आरक्षणासाठी सरसकट 27 टक्के जागा देण्याच्या मुद्द्यावरून आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला होता. सध्याच्या परिस्थितीनुसार, निवडणूक आयोग दोन टप्प्यात प्रक्रिया राबवण्याच्या तयारीत असून, आरक्षित वर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केल्याची पावती सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हेही वाचा- Gunaratna Sadavarte : 'निवडणुका आल्या की, दोन बेडूक डराव डराव करतात...', गुणरत्न सदावर्तेंनी ओवैसी आणि राज ठाकरेंना डिवचलं

महापालिका निवडणुकांनंतर लगेच आचारसंहिता?
राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 15 फेब्रुवारीच्या डेडलाईनमुळे, महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागण्यापूर्वीच जिल्हा परिषदांसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू झाली असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने आधीच दिल्या आहेत.

12 वीच्या परीक्षा आणि मतदानाची तारीख
फेब्रुवारी महिन्यातच निवडणुका होणार असल्याने शिक्षण क्षेत्रात काहीसा चिंतेचा सूर आहे. 10 फेब्रुवारी 2026 पासून 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत. बहुतांश मतदान केंद्रे शाळांमध्ये असतात आणि निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. परीक्षा आणि निवडणुका एकाच वेळी आल्याने प्रशासनासमोर मोठे नियोजन करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या तारखांच्या घोळाचा फटका परीक्षेला बसू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray: 'होय, मला निवृत्त व्हायचंय...', उद्धव ठाकरेंचा मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले?


सम्बन्धित सामग्री