Bulletproof coffee: अनेकांना सकाळची सुरुवात कॉफीशिवाय अपुरी वाटते. पारंपरिक कॉफीला थोडासा ट्विस्ट देत सध्या 'बुलेटप्रूफ कॉफी' म्हणजेच तूप घालून तयार केलेली कॉफी पिण्याचा ट्रेंड वाढत आहे. या कॉफीबाबत अनेक दावे केले जातात ती वजन कमी करण्यास मदत करते, ऊर्जा वाढवते आणि पचन सुधारते. पण हे खरोखर कितपत खरे आहे? याविषयी जाणून घेऊया.
आहारतज्ज्ञ कनिका मल्होत्रा यांच्या मते, तुपामध्ये 'कन्जुगेटेड लिनोलिक अॅसिड' (CLA) आणि 'ब्युटायरेट' नावाचे फॅटी अॅसिड असतात, जे शरीरातील चरबी कमी करण्यात मदत करतात. तसेच, हे घटक आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात. कॉफीमधील कॅफिन आणि तुपातील हे पोषक घटक एकत्र मिळून ऊर्जा आणि एकाग्रता वाढवण्याचे कार्य करतात. त्यामुळे दिवसाची सुरुवात बुलेटप्रूफ कॉफीने केल्यास ताजेपणा आणि उत्साहीपणा जाणवतो.
पण याचा अर्थ असा नाही की ही कॉफी सर्वांसाठी योग्य आहे. तुपात कॅलरीचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्यास लठ्ठपणा वाढू शकतो. त्याशिवाय, ज्या लोकांना उच्च कोलेस्ट्रॉल किंवा पचनाच्या समस्या आहेत, त्यांनी या प्रकारची कॉफी टाळावी. वजन कमी करण्यासाठी ही कॉफी उपयुक्त ठरू शकते, मात्र आहार नियोजन आणि व्यायामाविना त्याचा फारसा उपयोग होणार नाही.
शेवटी, बुलेटप्रूफ कॉफी ही काही 'चमत्कारी' पेय नाही. ती आरोग्यास लाभदायक ठरू शकते, पण योग्य प्रमाणात आणि योग्य व्यक्तींनीच ती सेवन करावी. कोणताही नवा आहार प्रयोग करताना आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच उत्तम.