Healthy Breakfast Tips: सकाळची सुरुवात कशी होते, यावर संपूर्ण दिवसाची ऊर्जा अवलंबून असते. रात्री ७-८ तास झोपल्यानंतर आपलं पोट पूर्णपणे रिकामं असतं. अशा वेळी आपण जे काही खातो, त्याचा थेट परिणाम पचनसंस्थेवर आणि शरीराच्या ऊर्जेवर होतो. मात्र धावपळीच्या जीवनशैलीत अनेक जण नाश्त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा समोर मिळेल ते पटकन खातात. हीच सवय पुढे अपचन, थकवा आणि चिडचिडेपणाचं कारण ठरू शकते.
रिकाम्या पोटी टाळावेत असे पदार्थ
सकाळी उठल्याबरोबर खूप आंबट फळे किंवा त्यांचा रस घेणे टाळावे. संत्री, मोसंबी किंवा लिंबूवर्गीय फळांमधील आम्ल पोटातील आम्लपातळी वाढवू शकते. त्यामुळे जळजळ किंवा ॲसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते.
तसेच, तिखट आणि मसालेदार पदार्थ सकाळी खाल्ल्यास पचनसंस्था अस्वस्थ होऊ शकते. विशेषतः ज्यांना गॅस किंवा अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांनी हे पदार्थ टाळावेत.
कोल्ड ड्रिंक्स किंवा सोड्यासारखी थंड पेये रिकाम्या पोटी घेतल्यास पोट फुगल्यासारखे वाटू शकते. शरीरातील आम्ल संतुलनही बिघडू शकते.
जास्त गोड पदार्थ जसे केक, पेस्ट्री किंवा चॉकलेट खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी पटकन वाढते आणि नंतर झपाट्याने कमी होते. त्यामुळे लवकरच भूक लागणे आणि थकवा जाणवणे स्वाभाविक आहे.
कच्च्या पालेभाज्यांचे सॅलड सकाळी पचायला जड जाऊ शकते. फायबरयुक्त पदार्थ आरोग्यासाठी चांगले असले तरी ते दुपारच्या जेवणात अधिक योग्य ठरतात.
मग नाश्त्याला काय खावे?
दिवसाची सुरुवात एका ग्लास कोमट पाण्याने करणे उत्तम. इच्छित असल्यास त्यात थोडासा लिंबूरस मिसळू शकता. यामुळे शरीराला ताजेपणा मिळतो आणि पचनक्रिया सक्रिय होते.
प्रोटीनयुक्त पदार्थ जसे उकडलेले अंडे, मूठभर बदाम किंवा अक्रोड हे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहेत. हे पदार्थ दीर्घकाळ पोट भरलेले ठेवतात आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारतात.
नाचणी, ओट्स किंवा गव्हाचा दलिया यांसारखे निरोगी कर्बोदके शरीराला हळूहळू ऊर्जा देतात. त्यामुळे साखरेची पातळी स्थिर राहते आणि थकवा कमी जाणवतो.
फळांमध्ये सफरचंद किंवा पपई सकाळी खाण्यास योग्य ठरतात. ही फळे पचनास मदत करतात आणि जीवनसत्त्वे पुरवतात.
इडली, डोसा किंवा ताजे दही यांसारखे किण्वित पदार्थ पोटातील चांगल्या जिवाणूंना पोषण देतात. त्यामुळे पचन सुधारते आणि शरीर अधिक ताजेतवाने राहते.