Indian Railway's Beautiful Routes : रेल्वेने प्रवास करण्यात जी मज्जा येते, ती मराठीतल्या अनेक कवींनी बालगीतांमधूनही व्यक्त केली आहे. 'झुक झुक आगीनगाडी..' म्हटलं की प्रवासाला लगेच तयार होणार नाही, असं मूल सापडणं अगदी अशक्य..! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रेल्वेतून प्रवास करणे आवडते.
भारतात रेल्वेचे सर्वांत मोठे जाळे विस्तारलेले आहे. दूरच्या प्रवासासाठी बहुतेकांची पहिली पसंती रेल्वेलाच असते. कारण, दूरच्या मार्गासाठी इतर कोणत्याही वाहनाच्या तुलनेत रेल्वेचा प्रवास सुखद आणि स्वस्त असतो. या रेल्वेने रोज असंख्य लोक प्रवास करत असतात. भारतात असे अनेक रेल्वे मार्ग आहेत, ज्यांच्या आजूबाजूला मनोहारी निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते. चला तर, मग जाणून घेऊया, भारतातील कोणत्या रेल्वे मार्गांनी गेलात, तर तुमचा प्रवास संस्मरणीय होईल...
हेही वाचा - चाणक्य नीती : नका जाऊ या ठिकाणी मुळीच.. अन्यथा, तुमच्या प्रतिष्ठेला बसेल धक्का; स्वाभिमान होईल चक्काचूर!
तर, भारतात असे अनेक रेल्वेमार्ग आहेत, ज्यावरून प्रवास करताना आपल्याला समुद्र आणि नद्यांचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते. पर्यटनाची आवड असणाऱ्यांनी भारतातील या सुंदर ठिकाणांचा प्रवास तर करायलाच हवा. ही सुंदर दृश्य पाहून तुम्ही मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही. हे सुंदर रेल्वे मार्ग घनदाट जंगल, जलाशय व वाळवंटातून जातात येथील सुंदर दृश्ये डोळ्यांचे पारणे फेडतात.
वास्को द गामा ते लोंडा
हा रेल्वेमार्ग गोव्यातील वास्को द गामा येथून सुरू होऊन कर्नाटकातील लोंडा पर्यंत जातो. पश्चिम घाटातील पर्वत रांगातून जाणाऱ्या या रेल्वेतून सुंदर असा दूधसागर धबधबा पाहायला मिळतो. रेल्वेतून दूधसागर धबधबा पाहणे एक वेगळाच अनुभव असतो. विशेष म्हणजे, येथून जाताना पर्यटकांना आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेता यावा आणि दूधसागर धबधबा पाहता यावा म्हणून येथून जाताना रेल्वेचा वेग कमी केला जातो.
मुंबई ते गोवा
कोकण रेल्वेचा मुंबई ते गोवा हा सर्वात सुंदर रेल्वेमार्ग आहे. या रेल्वेमार्गाने प्रवास करताना सह्याद्रीतील डोंगररांगा आणि अरब सागरातील सुंदर दृश्य पाहायला मिळतात. या मार्गाने जाताना सुंदर नद्या, बोगदे आहेत आणि पुलांवरून रेल्वे जाताना तर काळजाचा ठोका चुकतो. भारतातील सर्वांत उंच सेतू पनवलनादी पुलावरून हा मार्ग जातो. सुंदर हिरवळ, नारळाच्या झाडांचे सुंदर दृश्य या मार्गाने पाहायला मिळते.
मंडपम ते रामेश्वरम
तमीळनाडूतील मंडपम स्टेशन ते रामेश्वरम स्टेशन हा रेल्वेमार्ग भारतातील सर्वात सुंदर रेल्वेमार्गांपैकी एक आहे. हा रेल्वेमार्ग देशातील सर्वात लांब रेकवेब्रिज पैकी एक आहे, ज्याला पम्बन ब्रीज असे म्हटले जाते. या ब्रिजची लांबी 2.2 किलोमीटर इतकी आहे. हा ब्रीज मुख्य शहरापासून पम्बन द्वीपावर किंवा बेटावर पोहचण्यासाठी एकमेव मार्ग आहे. हा रेल्वेपूल पार करणे खूप रोमांचकारक आहे. या मार्गाने जाताना तुम्हाला खाली अथांग निळेशार पाणी पाहायला मिळते. यामध्ये नजर हरवून गेली नाही, तरच नवल..!
हेही वाचा - जगातील बहुतेक विहिरी सहसा गोल का आहेत, काय आहे यामागील रहस्य आणि वैज्ञानिक कारण?
भुवनेश्वर ते ब्रह्मपूर
ओडिशातील भुवनेश्वर ते ब्रह्मपूर हा रेल्वेमार्ग एक आगळेवेगळे निसर्गरम्य दृश्य दाखवतो. पूर्व घाट आणि ओडिशातील चिल्का सरोवराचे सुंदर दृश्य या मार्गावरून जाताना पाहायला मिळते. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर येथे तुम्हाला असंख्य स्थलांतरित पक्षी पाहण्याची संधी मिळेल.