Yogurt Storage Tips: आपल्या रोजच्या आहारात दहीचं एक विशेष स्थान आहे. जेवणासोबत एक वाटी दही मिळालं की जेवणाची मजा दुप्पट होते. पण अनेकदा असं होतं की, दोन दिवसातच दही आंबट होतं, त्याची चव बदलते आणि ते खाण्यायोग्य राहत नाही. मग प्रश्न पडतो दही फ्रिजमध्ये ठेवलं तरी ते एवढं लवकर खराब का होतं? चला जाणून घेऊया काही सोप्या पण प्रभावी टिप्स ज्या दह्याचं आयुष्य वाढवू शकतात.
योग्य भांड्याची निवड
दही साठवताना काचेचं किंवा सिरॅमिकचं भांडं वापरणं हे सर्वात उत्तम ठरतं. स्टील किंवा प्लास्टिकचे डबे दह्याच्या चवीवर परिणाम करतात आणि ते लवकर आंबट होण्याची शक्यता वाढवतात. त्यामुळे शक्यतो पारदर्शक काचेच्या जारमध्ये दही ठेवा.
झाकण नेहमी घट्ट ठेवा
फ्रिजमध्ये ठेवलेलं दही जर उघडं राहिलं, तर फ्रिजमधील इतर पदार्थांचा वास त्याला लागू शकतो. त्यामुळे दह्याचं झाकण नेहमी नीट बंद करा. यामुळे दह्याचा ओलावा टिकतो आणि त्याचं नैसर्गिक पोषणमूल्यही राखलं जातं.
दही बाहेर जास्त वेळ ठेऊ नका
दही तयार झाल्यावर किंवा बाजारातून आणल्यावर ते ताबडतोब फ्रिजमध्ये ठेवा. जास्त वेळ बाहेर ठेवलं, विशेषतः उष्ण तापमानात, तर ते लवकर आंबट होण्यास सुरुवात करतं. त्यामुळे जेवणानंतर लगेच उरलेलं दही परत फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय लावा.
एअरटाइट डबा वापरा
दह्यासाठी वापरलेला डबा हवा न जाणारा (एअरटाइट) असावा. त्यामुळे हवेतील जंतू आत शिरत नाहीत आणि दह्याचं शेल्फ लाइफ वाढतं. शिवाय, एअरटाइट डब्यात ठेवलं की दही जास्त काळ ताजं आणि घट्ट राहतं.
कोरडा आणि स्वच्छ चमचा वापरा
दह्याच्या भांड्यात ओला किंवा दुसऱ्या पदार्थाला लागलेला चमचा घातल्यास दह्यात जंतूंची वाढ होते. त्यामुळे प्रत्येक वेळी दही काढताना चमचा कोरडा आणि स्वच्छ असावा.
या छोट्या टिप्सचा अवलंब केल्यास दही तीन नव्हे, तर पाच ते सात दिवस ताजं राहू शकतं. फक्त साठवण्याची काळजी घेतली, तर तुम्ही चव आणि पोषण दोन्ही राखू शकता. आता दही आंबट होईल याची चिंता न करता निश्चिंतपणे खा कारण ताजं दही म्हणजे थंडावा, आरोग्य आणि स्वाद यांचा परिपूर्ण संगम!