मुंबई : महागाईचा भार सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा ताण देत आहे. कोविडच्या काळानंतर कंपन्यांकडून फारशी पगारवाढ केली जात नाही आहे. कमी उत्पन्न गट आणि मध्यमवर्गीय यामध्ये भरडले जात आहेत. गृह कर्ज, वाहन कर्ज, घरखर्च, लग्न, मुलांचे शिक्षण असे एक ना अनेक खर्च वाढत असताना लोक आर्थिक अडचणींत सापडत आहेत. अनेकांच्या बाबतीत तर पगार येण्याआधीच संपतो आणि मग क्रेडिट कार्डचा आधार घ्यावा लागतो, अशीही स्थिती आहे. मग, तिथेही पुन्हा कर्जासारखी स्थिती निर्माण होते.
या सर्व अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी स्वतःच थोडी शिस्त लावून घेणं आणि काटेकोर नियोजन करणं आवश्यक आहे. असं केल्यामुळे कमी पगारातही चांगली बचत करता येईल.
हेही वाचा - पर्सनल लोनचाही करता येतो विमा! 'या' अडचणींमध्ये मिळतात अनेक फायदे
पगार येण्याआधीच बजेट ठरवा
आपल्याकडे येणाऱ्या पैशाचं नियोजन म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग (Financial Planning) असणं आवश्यक आहे. सर्वात आधी, महिन्याच्या सुरुवातीलाच बजेट ठरवा. आधी आवश्यक खर्च, घरभाडं, बिलं, EMI, घरखर्च यांना प्राधान्य द्या. त्यानंतर उरलेल्या पैशांपैकी छंद, शॉपिंग, मुव्ही, खाणं-पिणं यासाठी आपण किती बजेट ठेवावे, याचा विचार करून ती रक्कम ठरवा. हे सर्व काही घरखर्चाची नोंद वही किंवा डायरी तयार करून त्यात लिहून ठेवावे. यातून आपण किती रक्कम बचत करू शकतो, याचा अंदाज घ्या. तेही लिहून ठेवा. घरातील विश्वासू सदस्यांसोबत ही डायरी शेअर करू शकता. याच्यामुळे त्यांनाही आर्थिक बाबीचा अंदाज आणि जागरूकता येईल. एकदा पगार खात्यात आला की, सर्वप्रथम बचतीची रक्कम निश्चित ठिकाणी गुंतवा. उरलेल्या पैशांतून महिन्याचा खर्च करा. यामुळे आपोआप 'आर्थिक शिस्त' (Financial Discipline) निर्माण होईल.
असा दृष्टिकोन ठेवा
बचत करताना 'पगार उरला तर बचत करायची' असं न करता, 'बचत केल्यानंतर उरलेल्या पैशांत खर्च करायचा' हा दृष्टिकोन ठेवा. सुरुवातीचे 6 महिने पगाराचा 10% भाग बचतीसाठी बाजूला ठेवा. त्यानंतर हाच टक्का वाढवत 20% आणि मग 30% पर्यंत घ्या. पगाराचा 30% जर तुम्ही नियमितपणे बचत करू लागलात, तर तुम्ही सहजपणे आर्थिक बचतीचं ध्येय गाठू शकता.
अनावश्यक खरेदीचा मोह टाळा
ऑनलाईन ऑफर्स, सहज उपलब्ध वस्तू, आणि 'वन क्लिक' खरेदीचा मोह टाळा. प्रत्येक खरेदीच्या आधी स्वत:ला एक प्रश्न विचाराः "हे खरंच गरजेचं आहे का?" जर उत्तर नाही आलं, तर हा खर्च टाळण्याचा निर्णय कठोरपणे घ्या. यामुळे तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे वाचू शकतात. बचत म्हणजे केवळ पैसा राखून ठेवणं नव्हे, तर ती आपल्या भविष्याची आर्थिक सुरक्षा आहे. त्यामुळे आजपासूनच आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि शहाणपणाने बचतीची सवय लावा.
हेही वाचा - कर्जाचा सापळा : क्रेडिट कार्डवरून पैशांची प्रचंड उधळपट्टी; वर्षभरात थकित रक्कम 28 टक्क्यांनी वाढून 6,742 कोटींवर
फक्त पगारावर अवलंबून राहू नका
- दैनंदिन कामे आणि कामाच्या ठिकाणी जाणारा वेळ वगळता रिकाम्या वेळात आणखी एखादं पैसे मिळवून देणारं काम सुरू करा.
- आपलं करिअर फक्त विशिष्ट क्षेत्रापुरतं मर्यादित न ठेवता स्वतःला आणि आपल्यातील एखाद्या कौशल्याला अधिक वाव द्या. यातून अर्थार्जन शक्य होते का, ते पाहा.
- कामे करण्याचा वेग वाढवा. स्वयंशिस्तीवर भर द्या. याबाबात घरातील सदस्यांशी चर्चा करा आणि दिवसभरातील कामांची योग्य जुळवणी करा.
- फालतू आणि रिकामटेकड्या कामांत वेळ घालवू नका.
- मनोरंजनासाठी मर्यादित वेळ ठेवा. त्याऐवजी तुम्ही तुमचे असे आवडते कामही करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल.
- टीव्ही, ओटीटी, मोबाईल यावर जाणारा स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा. यात किती वेळ फुकट जातो, ते लक्षात येत नाही.
- ऑफिसला जाता-येताना लागणारा वेळ शक्य असेल, एखाद्या उपयुक्त कामात घालवा. यासाठी शक्य असल्यास ऑफिसला जाण्या-येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांनी प्रवास करा.
- या सर्व धावपळीत मानसिक संतुलन राखण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप घ्या.
(Disclaimer : ही बातमी सामान्य ज्ञानावर आधारित आहे आणि केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने दिलेली आहे. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)