Friday, April 25, 2025 10:12:02 PM

Noise Cancelling Headphones : नॉइज-कॅन्सलिंग हेडफोन्सचा मेंदूच्या क्षमतेवर गंभीर परिणाम? जाणून घ्या, काय आहेत उपाय..

लोकांना हेडफोन उपयुक्त वाटतात, कारण त्यामुळे गाणी ऐकताना किंवा बोलताना इतर कामेही करता येतात आणि आजूबाजूच्या नको असलेल्या आवाजांपासून सुटकाही मिळते. परंतु, तज्ज्ञांनी याबाबत गंभीर इशारा दिला आहे.

noise cancelling headphones  नॉइज-कॅन्सलिंग हेडफोन्सचा मेंदूच्या क्षमतेवर गंभीर परिणाम जाणून घ्या काय आहेत उपाय

Side effect of Noise cancelling headphones :  गाणी ऐकताना किंवा आजूबाजूचा आवाज येऊ नये म्हणून नॉइज-कॅन्सलेशनचे फीचर या हेडफोन्समध्ये आले आहे. हे हेडफोन्स मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. सध्याच्या काळात हेडफोन्स आणि इअरफोन्सचा वापर अगदी मोबाइल फोनइतक्याच प्रमाणात केला जातो. हेडफोन्स इतके लोकप्रिय झाले आहेत की, नॉइज-कॅन्सलिंग हेडफोन्सचे मार्केट 2031 पर्यंत 45.4 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

अनेकांना काम करायचे असो किंवा रिकामा वेळ घालवायचा असो, अशी मंडळी हेडफोन्स लावून गाणी ऐकत असतात किंवा फोनवर बोलत असतात. लोकांना हेडफोन उपयुक्त वाटतात, कारण त्यामुळे गाणी ऐकताना किंवा बोलताना इतर कामेही करता येतात. तसेच, आजूबाजूच्या नको असलेल्या आवाजांपासून यामुळे सुटका मिळते. परंतु, तज्ज्ञांनी या हेडफोनचा वापर करणाऱ्यांना इशारा दिला आहे आणि मेंदूवर होणाऱ्या गंभीर परिणामाविषयी चिंता व्यक्त केली आहे. तज्ज्ञांचे असे मत आहे की, या हेडफोनमुळे आसपासच्या आवाजांना रोखण्याची मेंदूची नैसर्गिक क्षमतादेखील कमी होऊ शकते. तसेच, इतर वेगवेगळ्या आवाजांमधून हव्या असलेल्या आवाजावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही कमी होऊ शकते. त्यातच, नॉइज-कॅन्सलिंग हेडफोन्स मेंदूसाठी घातक का ठरू शकतात? त्यामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात? तज्ज्ञ काय सांगतात? त्याविषयी जाणून घेऊ.

हेही वाचा - Anorexia Nervosa: कसंबसं 24 किलो वजन.. तरीही वजन घटवण्याचा अट्टाहास.. वेडेपणापायी किशोरवयीन मुलीने जीव गमावला!

मेंदूवर परिणाम झाल्यास उद्भवतात ऐकण्याच्या समस्या
ब्रिटन येथील नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस (NHS) मधील ऑडिओलॉजिस्ट्सनी इशारा दिला आहे की, या नॉइज-कॅन्सलिंग हेडफोन्सच्या वाढत्या वापरामुळे मेंदूला चालना देणाऱ्या श्रवणविषयक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, अधिक तरुण लोक त्यांच्याकडे ऐकण्याशी संबंधित समस्या घेऊन येत आहेत. या प्रकरणांची बारकाईने तपासणी केल्यावर असे आढळून आले की, त्यांची श्रवणशक्ती चांगली असूनही ते नीट ऐकू शकत नाहीत. त्यांची समस्या न्यूरोलॉजिकल आहे, म्हणजेच मेंदूला जे ऐकू येते त्यावर प्रक्रिया करण्यात अडचण येत आहे.

या स्थितीला ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर (एपीडी) म्हणतात. जेव्हा मेंदूला शब्द किंवा ध्वनींवर प्रक्रिया करण्यात अडचण येते, तेव्हा हा विकार उद्भवतो. एपीडी असलेल्या लोकांना सार्वजनिकरित्या संवाद साधणे किंवा कामावर, तसेच शाळेत सूचना समजणे कठीण जाते. त्यांना परदेशी उच्चार किंवा झटपट बोलणाऱ्यांचे ऐकण्यातही अडचण येऊ शकते. हा विकार सामान्यत: कानाच्या संसर्गाशी, बालपणातील मेंदूला दुखापत किंवा जनुकातील दोषाशी संबंधित असला तरी अनेक व्यक्तींमध्ये या समस्या नसूनदेखील हा विकार उद्भवत आहेत.

ऐकू येण्याच्या क्षमतेसह मेंदूच्या विश्लेषण करण्याचा क्षमतेवर परिणाम
तज्ज्ञ म्हणतात, मेंदूने कशावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे हे निर्धारित करण्यासाठी विविध प्रकारचे आवाज ऐकणे महत्त्वाचे आहे. मेंदूने कारच्या बीप किंवा ट्रेनचा आवाज यांसारख्या सामान्य आवाजांना ब्लॉक केल्यास त्यांच्यावर आवश्यक ती प्रतिक्रिया करणे राहून जाऊ शकते. 'तुम्हाला जे ऐकायचे आहे, केवळ तेच ऐकू येण्यासाठी हेडफोन घालून सभोवताली जवळजवळ खोटे वातावरण तयार केले जाते. इतर आवाज ऐकू येत नसल्याने तुमचा मेंदू आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया देत नाही. पुढे मेंदूला हळूहळू तशीच सवय लागू शकते.'

“मेंदूतील ती अधिक क्लिष्ट, उच्चस्तरीय ऐकण्याची कौशल्ये तुमच्या किशोरवयीन वयातच विकसित होतात. त्यामुळे, जर तुम्ही फक्त नॉइज-कॅन्सलिंग हेडफोन्सचा वापर करत असाल, तर तुमच्या बोलण्याच्या आणि आवाजावर प्रक्रिया करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो,” असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

'जर तुम्ही तुमच्या कानावर हेडफोन्स घालणे बंद केले तर तुमचा मेंदूला त्याचा अंतर्गत फायदा मिळू लागेल आणि तो फायदा वाढवणेही मेंदूला शक्य होईल. हेडफोन्समुळे मेंदूतील न्यूरल मार्ग पूर्णपणे बदलतात.' तसेच याचा लोकांच्या संगीत ऐकण्याच्या आणि व्हिडीओ पाहण्याच्या पद्धतीवरही परिणाम होतो. एका सर्वेक्षणानुसार, 18 ते 24 वयोगटातील पाच तरुण प्रौढांपैकी तीनहून अधिक त्यांचे आवडते शो सबटायटलसह पाहतात, असे दिसून आले आहे.

हेही वाचा - व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D ची कमतरता अत्यंत हानिकारक! पण सप्लिमेंटस् योग्य पद्धतीने घेतल्या तरच होईल फायदा

इतर प्रतिकूल परिणाम
- नॉइज-कॅन्सलिंग हेडफोन्समुळे उद्भवणाऱ्या प्राथमिक चिंतेंपैकी एक म्हणजे प्रवास करताना रहदारी किंवा घोषणांसारख्या महत्त्वाच्या सभोवतालच्या आवाजांपासून अनभिज्ञ होण्याची शक्यता. म्हणजेच मेंदूकडून अशा आवाजांकडे आपोआप दुर्लक्ष केले जाणे.
- नॉइज-कॅन्सलिंग इअरबड्स शांतता आणू शकतात. परंतु, रेल्वे स्टेशन किंवा इतर कोणत्याही ठिकाणच्या महत्त्वाच्या सूचना ऐकू आल्या नाहीत, तर, जिवावरचा धोकाही निर्माण होऊ शकतो. 
- दीर्घकाळ हेडफोन घालणे आणि जास्त आवाज ऐकल्याने कानाच्या अंतर्गत दाब वाढू शकतो आणि अस्वस्थता, काहीही ऐकण्याची इच्छा न होणे, डोकेदुखी, दिशाभूल आणि चक्कर येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. 
- अस्वच्छतादेखील कानाच्या संसर्गाचा धोका वाढवू शकते, कारण त्यामुळे कानाच्या अंतर्गत भागात ओलावा कायम राहतो.

अशी समस्या निर्माण झाल्यास किंवा ती होऊच नये, म्हणून काय करावे?
- आवाजाच्या वातावरणात मेंदू आणि कानांना शब्दांवर प्रक्रिया करण्यासाठी हेडफोन्स न घालणे हा एक सामान्य उपचार आहे.
- ऑडिओलॉजिस्ट नॉइज-कॅन्सलिंग हेडफोन्सचा वापर संतुलित करण्याचे सुचवतात, कारण कानांना आवाज फिल्टर करण्याची क्षमता राखण्यासाठी सतत नैसर्गिक आवाज ऐकत राहणे महत्त्वाचे आहे.
- कोणत्याही हेडफोनचा वापर दिवसातून दोन ते तीन तासांपर्यंत वापर मर्यादित ठेवण्याची शिफारस तज्ज्ञांनी केली आहे.

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री