Tuesday, February 17, 2026 05:51:40 PM

Chhatrapati Sambhajinagar Election 2026: '.. सत्तेची आणि पैशाची मस्ती'; अंबादास दानवेंचे भाजपवर गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 11 लाख 18 हजार 263 मतदारांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधीच शहरात 'पैसे वाटपा'च्या आरोपांनी राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.

chhatrapati sambhajinagar election 2026  सत्तेची आणि पैशाची मस्ती अंबादास दानवेंचे भाजपवर गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar Election 2026 : छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील 29 महापालिकांच्या रणधुमाळीत आज, गुरुवारी 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 11 लाख 18 हजार 263 मतदारांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच शहरात 'पैसे वाटपा'च्या आरोपांनी राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पक्षावर थेट हल्लाबोल करत, शहरात 'पैशाचा पाऊस' पाडल्याचा गंभीर आरोप केला आहे.

'पहाटे 4 वाजेपर्यंत फोन आले'; दाव्याने खळबळ
अंबादास दानवे यांनी आज सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. "भाजपला सत्तेची आणि पैशाची मस्ती आली आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. मतदानाच्या आदल्या रात्री आणि आज पहाटे 4 वाजेपर्यंत मला कार्यकर्त्यांचे फोन येत होते की, कशा प्रकारे शहरात पैशाचे वाटप सुरू आहे, असा दावा दानवेंनी केला. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना मतं मिळवण्यासाठी पैशाचा आधार का घ्यावा लागतो? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा - Maharashtra Election 2026 : दोन पक्ष, एक उमेदवार! काँग्रेसच्या उमेदवाराला 'वंचित'चंही तिकीट, इम्तियाज जलील यांचा आयोगाला सवाल

निवडणूक आयोगावर 'कुंभकर्ण' असल्याची टीका
प्रशासकीय यंत्रणा आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही दानवे यांनी ताशेरे ओढले. निवडणूक आयोग सध्या 'कुंभकर्णाची झोप' घेत असल्याची टीका करत, सत्तेच्या दबावाखाली प्रशासन एकांगी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता उरली नसल्याचे सांगत त्यांनी मतदारांना आवाहन केले की, त्यांनी या पैशाच्या माजला मतपेटीतून उत्तर द्यावे आणि योग्य व्यक्तीच्या पाठीशी उभे राहावे.

राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा ऐरणीवर
राजकारणातील या संघर्षासोबतच दानवे यांनी राज्यातील विदारक परिस्थितीकडेही लक्ष वेधले. "राज्यात परिवर्तनाची नितांत गरज आहे," असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. त्यांच्या माहितीनुसार, 2025 या एका वर्षात तब्बल 1150 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विकासाचा खोटा फुगा उडवून सत्ताधारी जनतेची दिशाभूल करत असून, मतदारांनी या भ्रमिष्ट प्रचाराला बळी पडू नये, असा इशारा त्यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगरमधील या चुरशीच्या लढतीत आता मतदार कोणाच्या पारड्यात आपले दान टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 2026 च्या या महापालिका निवडणुका राज्याच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या मानल्या जात आहेत. पैशाच्या आरोपांमुळे निर्माण झालेला हा पेच मतदानाच्या टक्केवारीवर काय परिणाम करतो, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - Nagpur Election : नागपूरमध्ये किती जागांसाठी लढत? मतदारराजाचा कौल कोणाला...जाणून घ्या कोणत्या पक्षांमध्ये चुरशीचा सामना?


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या