Nagpur Politics: नागपुरात हायव्होल्टेज ड्रामा; समर्थकांनी बंडखोर नेत्यालाच घरातच डांबलं, नेमकं झालं काय?

भाजपचे बंडखोर उमेदवार किसन गावंडे यांनी माघार घेऊ नये, यासाठी त्यांच्याच समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या घराला बाहेरून कुलूप ठोकले.

Nagpur Politics: नागपुरात हायव्होल्टेज ड्रामा; समर्थकांनी बंडखोर नेत्यालाच घरातच डांबलं, नेमकं झालं काय?

Nagpur Politics: महापालिका निवडणुकीच्या रणांगणात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपुरात एका थरारक राजकीय नाट्याचा अनुभव आला. भाजपचे बंडखोर उमेदवार किसन गावंडे यांनी माघार घेऊ नये, यासाठी त्यांच्याच समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या घराला बाहेरून कुलूप ठोकले. पक्षाचा वाढता दबाव आणि समर्थकांचा हट्ट या कात्रीत गावंडे अडकले असून, या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

नेमका प्रकार काय?

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. भाजपचे अधिकृत ‘एबी फॉर्म’धारक किसन गावंडे यांना पक्षाने ऐनवेळी माघार घेण्याचे आदेश दिले. मात्र, गावंडे अर्ज मागे घेण्यासाठी घराबाहेर पडू नयेत, यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाला वेढा घातला आणि त्यांना घरातच डांबून ठेवले.

कार्यकर्त्यांचा रोष आणि पक्षावर आरोप

समर्थकांच्या मते, हा भाग सातत्याने राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित राहिला आहे. यापूर्वीचे सर्व उमेदवार इतर भागांतील लादले गेले होते. यंदा स्थानिक उमेदवाराला संधी मिळाल्यावर पक्षाने माघार घेण्यास सांगणे हा कार्यकर्त्यांवर अन्याय आहे, असा आरोप समर्थकांनी केला आहे. गावंडे यांच्यावर पक्षाकडून प्रचंड दबाव टाकला जात आहे, पण आम्ही आमचा हक्काचा उमेदवार गमावणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

हेही वाचा – Ramdas Athawale vs Raj Thackeray : राज ठाकरेंची भाषणं भारी, पण पाटी कोरी…; रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर कविता

मला बाहेर जाऊ द्या – किसन गावंडे यांची आर्त

घरातूनच माध्यमांशी संवाद साधताना गावंडे यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले, पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली होती, पण आता माघार घेण्यास सांगितले जात आहे. मी अर्ज मागे घेण्यासाठी निघालो होतो, पण माझ्या कार्यकर्त्यांनी मला रोखण्यासाठी घराला कुलूप लावले आहे. या विधानामुळे भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

आईची भावूक साद

या राजकीय संघर्षात एक भावनिक वळणही पाहायला मिळाले. किसन गावंडे यांच्या आईने कॅमेऱ्यासमोर येत, माझ्या मुलाला निवडणूक लढू द्या, अशी विनंती केली. एका आईने राजकारणाच्या या रणधुमाळीत आपल्या मुलासाठी केलेली ही आर्त हाक नागपूरकरांच्या काळजाला भिडणारी ठरली. केवळ नागपूरच नाही, तर राज्यातील सर्वच प्रमुख शहरांत बंडखोरीने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढवली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत बंडखोरांना मनवण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरू होती. मात्र, नागपुरातील या ‘कुलूपबंद’ आंदोलनाने निवडणुकांमधील तणाव आणि कार्यकर्त्यांची टोकाची निष्ठा अधोरेखित केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number