BMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. वरळीचे नेते संतोष धुरी यांनी भाजपची वाट धरल्यानंतर अवघ्या 24 तासांत मनसेला आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे. पक्षाचे फायरब्रँड नेते आणि अमित ठाकरे यांच्या कोअर कमिटीचे खंदे शिलेदार विरेंद्र तांडेल यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
तांडेल यांचा गंभीर आरोप
अनेक वर्षांपासून मनसेशी एकनिष्ठ राहिलेल्या विरेंद्र तांडेल यांनी बाहेर पडताना पक्षांतर्गत कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजीनामा देताना ते म्हणाले की, ‘पक्षात गेल्या काही काळापासून घुसमट होत होती. महत्त्वाच्या प्रक्रियांमधून जाणीवपूर्वक डावलले जात असून स्वाभिमान गहाण ठेवून काम करणे आता शक्य नाही.’ या विधानामुळे मनसेमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
हेही वाचा – Raj Thackeray: ‘सभेसाठी शिवतीर्थावर या, तुमच्याशी भरभरुन बोलायचंय…’; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आमंत्रण
अमित ठाकरेंसाठी मोठा व्यक्तिगत धक्का
विरेंद्र तांडेल हे केवळ माजी नगरसेवक नसून राजपुत्र अमित ठाकरे यांच्या कोअर टीमचे सक्रिय सदस्य होते. तरुण कार्यकर्त्यांमध्ये असलेली त्यांची पकड पाहता, ऐन निवडणुकीत त्यांनी दिलेला ‘जय महाराष्ट्र’ मनसेच्या मुंबईतील संघटनात्मक बांधणीसाठी मोठे नुकसान मानले जात आहे.
राजीनाम्यामागील कारण
प्राप्त माहितीनुसार, तांडेल यांच्या राजीनाम्यामागे केवळ अपमानच नाही तर स्थानिक पातळीवरील ‘कुरघोडी’ हे प्रमुख कारण आहे. स्थानिक नेत्यांकडून होणाऱ्या त्रासामुळे तांडेल दीर्घकाळ नाराज होते. वारंवार तक्रारी करूनही वरिष्ठ नेत्यांनी याकडे लक्ष न दिल्याने अखेर त्यांनी पक्ष सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतला. संतोष धुरी यांच्यानंतर तांडेलही भाजप किंवा इतर पक्षात जाणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – Ajit Pawar : ‘काकांच्या पुण्याईनेच माझं लय बरं चाललंय..’; पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांची गुगली
बालेकिल्ल्यात मनसेचे टेन्शन वाढले
मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजलेला असताना, एकापाठोपाठ एक ‘फायरब्रँड’ नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. मराठी मतांचे विभाजन रोखण्याचे मोठे आव्हान आता मनसेसमोर असणार आहे. तांडेल यांच्या जाण्याने दक्षिण मुंबई आणि उपनगरातील मनसेच्या व्होट बँकेवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.