सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज निकालाचा दिवस उजाडला असून राज्यातील अनेक ठिकाणी सकाळी 10 वाजल्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, सोलापूरमध्ये काल एक धक्कादायक घटना समोर आली होती. एका हॉटेलमध्ये ईव्हीएम मशिन्स उघड्यावर आढळून आल्याची बाब उघडकीस आली होती. या प्रकरणानंतर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देत संबंधित मशिन्स या अतिरिक्त असून त्यामध्ये कोणताही डेटा नसल्याचे स्पष्ट केले होते.
या घटनेनंतर आज आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांनी सोलापूरमध्ये स्ट्रॉंग रूममधून ईव्हीएमसह एक वाहन बाहेर नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आणला. संबंधित वाहन निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
या घटनेप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. संबंधित कायद्यांअंतर्गत चालकावर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोलापूरचे जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनाकडून घटनेची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्याची मागणी होत आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरू असतानाच समोर आलेल्या या घटनांमुळे राजकीय वातावरण तापले असून पुढील काही तासांत या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.