Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका करत राजकीय वर्तुळात नवा वाद ओढवून घेतला आहे. ‘कोणत्याही कोनातून पाहिल्यास उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र वाटत नाहीत आणि त्यांना तसे म्हणवून घ्यायलाही लाज वाटते,’ अशा शब्दांत राणेंनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून थेट सवाल
उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या राजकीय भूमिकेवर निशाणा साधताना नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी स्वतः हिंदू असल्याचा पुरावा द्यावा. ‘आमच्या हिंदूंमध्ये जाणीवपूर्वक फूट पाडली जात आहे. बाळासाहेबांनी हिंदुत्वाशी कधीच तडजोड केली नाही, म्हणूनच मुंबईतील दंगलीत मराठी माणूस वाचला. मात्र, आजच्या शिवसेनेत बॉम्बस्फोटाचे आरोपी आणि ‘हिरवे साप’ (विशिष्ट विचारसरणीचे लोक) शिरले आहेत. हे चित्र पाहून बाळासाहेबांना नक्कीच वाईट वाटलं असतं,’ असे राणे म्हणाले.
मुलांच्या बेरोजगारीची भीती –
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित जवळीकीवर भाष्य करताना राणेंनी कौटुंबिक राजकारणावर निशाणा साधला. ते म्हणाले, हे दोन्ही भाऊ मराठी माणसासाठी नव्हे, तर आदित्य आणि अमित ठाकरे बेरोजगार होतील या भीतीने एकत्र आले आहेत. जर तुम्ही मराठी माणसाच्या हिताचा विचार करत होतात, तर मुंबईतील मराठी माणसाचा टक्का तुमच्या सत्तेच्या काळात का घसरला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मंदिरांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह
उद्धव ठाकरेंच्या सत्तेच्या संभाव्य पुनरागमनावर भीती व्यक्त करताना राणे म्हणाले, ‘मुंबईत जर चुकून यांची सत्ता पुन्हा आली, तर आपली मंदिरेही सुरक्षित राहणार नाहीत.’ मुंबईतील मराठी अस्मिता आणि हिंदू धर्म धोक्यात असल्याचा दावा करत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवला.