Water Cuts in Maharashtra: अपुरा पाऊस आणि ‘एल निनो’चा संभाव्य प्रभाव यामुळे निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीचा अंदाज घेऊन, महाराष्ट्र सरकारने राज्यभर पाणीकपात लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी यासंदर्भात घोषणा केली. त्यानुसार 16 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के पाणीकपात लागू केली जाईल. हा निर्णय सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना लागू होणार असून मुंबईत 15 मेपासूनच 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
योजना 31 ऑगस्ट 2027 पर्यंत राहणार लागू
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा आणि वापराच्या स्वरूपानुसार एक सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. ही योजना 31 ऑगस्ट 2027 पर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. यामध्ये ‘एल निनो’चा प्रभाव आणि भविष्यातील दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. यासोबतच पाणी गळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवणे आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) पूर्ण क्षमतेने चालवण्याच्या कडक सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
उद्योगांना 30 टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्याचे निर्देश
औद्योगिक क्षेत्रातील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उद्योगांना त्यांच्या एकूण वापरापैकी किमान 30 टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच राज्यातील प्रत्येक धरणात 10 टक्के अतिरिक्त आपत्कालीन पाणीसाठा (बफर स्टॉक) राखून ठेवला जाणार आहे. बाष्पीभवन, गाळ आणि अनधिकृत पाणी उपसा विचारात घेऊन हा राखीव साठा ठेवण्यात येईल. पाणी वाटपात पिण्याचे पाणी, पशुधन आणि चारा यांना प्रथम प्राधान्य असेल, तर उपलब्ध साठ्यानुसार सिंचनासाठी पाणी दिले जाईल.
हेही वाचा – नवी मुंबईत मंगळवारी 16 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद; ‘या’ भागावर होणार परिणाम
अनधिकृत उपशावर कडक कारवाई आणि आंतर-विभागीय देखरेख
धरणे, नद्या आणि कालव्यांमधून होणाऱ्या अनधिकृत पाणी उपशाविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जलसंपदा, महसूल आणि पोलीस विभाग संयुक्तपणे गस्त घालून अनधिकृत उपशासाठी वापरले जाणारे पंप जप्त करतील. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जलसंपदा, महसूल, कृषी, उद्योग आणि नगरविकास विभाग समन्वयाने काम करत आहेत. या संकटसमयी नागरिकांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.