अमरावतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीच्या मेळघाटात 30 ते 40 आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली. शासकीय आदिवासी आश्रमशाळा टीटंबा येथील ही घटना असून रात्रीच्या जेवणातून विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मेळघाटात असतानाच ही घटना उघडकीस आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या धारणी तालुक्यातील मेळघाट परिसरातील टीटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान गुरुवारी अमरावतीच्या मेळघाटातील टीटंबा आश्रमशाळेतील विषबाधेच्या घटनेची व्याप्ती आता अधिक वाढली असून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 70 वर पोहोचली आहे. बाधित सर्व विद्यार्थी 18 वर्षांखालील असून विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच आश्रमशाळा प्रशासनाने तत्काळ विद्यार्थ्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
विद्यार्थ्यांची चाचणी केली असता रात्रीच्या जेवणातून त्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले. या आश्रमशाळांसह 8 ते 9 शाळांना 'सेंट्रल किचन'मधून जेवणाचा पुरवठा केला जातो. मात्र विषबाधा झाल्याचा प्रकार टीटंबा येथील आदिवासी आश्रमशाळेतून समोर आला. दरम्यान विद्यार्थ्यांवर युद्धपातळीवर उपचार सुरू असून सर्वांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाचे बारकाईने लक्ष आहे. तसेच दूषित पाणी की अन्नातील बिघाड यामुळे ही विषबाधा झाली? या सर्व बाजूने आता प्रशासनाकडून सखोल तपास केला जात आहे.