मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. आज, 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मात्र मतदान होण्यापूर्वीच राज्यातील तब्बल 66 उमेदवार विजयी झाले आहेत. हे 66 उमेदवार बिनविरोध निवडणून आल्याने त्यांच्या गळ्यात निवडणुकीशिवायच विजयी माळ पडली आहे. निवडणुका बिनविरोध करण्यात भाजपाने आघाडी घेतली आहे. यात भाजपाचे 44 उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून त्यापाठोपाठ निवडणुका बिनविरोध करण्यात शिंदेंच्या शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिंदेंच्या शिवसेनेते तब्बल 19 नगरसेवक बिनविरोध विजयी झालेत. कल्याण-डोंबिवलीत भाजपचे सर्वाधिक 15 उमेदवार तर शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर मालेगावमधून इस्लाम पार्टीच्या एक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
सामान्यतः महापालिका निवडणुकांमध्ये एखाद-दुसऱ्या प्रभागातच बिनविरोध निकाल लागतो. मात्र यंदा ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, जळगाव, पनवेल, भिवंडी-निजामपूर अशा अनेक महत्त्वाच्या महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आले. विशेष म्हणजे या सर्व ठिकाणी सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांनाच याचा लाभ झाल्याचे दिसून येते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आणि अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान अनेक शहरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी वादावादी, आरोप-प्रत्यारोप, तर काही ठिकाणी थेट अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी धमकावण्यात आल्याचे गंभीर आरोप केले. सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी, यासाठी शासकीय यंत्रणा काम करत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे 15 आणि शिवसेना (शिंदे गट) चे 6 असे एकूण 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे प्रत्येकी दोन उमेदवार बिनविरोध विजयी ठरले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील चार महापालिकांमध्ये एकूण 17 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, त्यात भाजप, शिंदे गट आणि स्थानिक पक्षांचा समावेश आहे. अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील महापालिकांमध्ये कोणत्याही प्रभागात बिनविरोध निवडणूक झाली नाही, हे विशेष.