Malad Society Horror: मुंबईतील मालाड परिसरातील इंटरफेस हाइट्स सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीच्या आवारात खेळत असताना 7 वर्षांच्या मुलाला कारने चिरडले. या घटनेत मुलाच्या पायाला गंभीर जखमी झाली. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता घडली. हा संपूर्ण प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेनंतर बांगूर नगर पोलिसांनी कारचालक श्वेता शेट्टी-राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलाचे नाव अन्वय मजुमदार (वय 7) असे असून तो आपल्या मित्रांसोबत सोसायटीच्या आवारात खेळत होता. तेव्हाच काळ्या रंगाची टोयोटा हायराइडर (MH47B.T.3070) कारने त्याला धडक दिली. अन्वयच्या डाव्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल, अंधेरी येथे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
हेही वाचा - Mumbai Metro Line 12: कल्याण ते नवी मुंबई फक्त 45 मिनिटांत! मेट्रो लाईन 12मुळे प्रवाशांना मोठा दिलासा
अन्वयची आई महुआ मजुमदार यांनी 20 ऑक्टोबर रोजीच्या पुरवणी निवेदनात दावा केला की हे कृत्य 'जाणूनबुजून आणि हेतुपुरस्सर' होते. तिने आरोप केला की आरोपी, जी सोसायटी सेक्रेटरीची पत्नी आहे, तिने अविचारीपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवली आणि तिच्या मुलाला चिरडले. पूर्वी दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाले होते. त्या वादातून सूडाने ही घटना घडवली गेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - MNS Diwali Deepotsav Mumbai: ‘दीपोत्सवाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न’, मनसेकडून सरकारच्या पर्यटन विभागाची कानउघडणी; म्हणाले, 'हा उमदेपणा नाही!'
महिला चालकाविरोधात गुन्हा दाखल
महुआ यांनी असेही नमूद केले की, घटनेनंतर आरोपीने वैद्यकीय खर्च उचलण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यानंतर मुलाची तब्येत विचारण्यासाठी त्यांनी एकदाही फोन केला नाही. बांगूर नगर पोलिसांनी श्वेता शेट्टी-राठोड यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 281 आणि 125(b) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे. सध्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून, घटनेतील हेतू आणि निष्काळजीपणाच्या कोनातून तपास सुरू आहे.