छत्रपती संभाजीनगर: नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 93 वर्षांचे एक आजोबा आपल्या बायकोसाठी सोन्याच्या दुकानात सोने खरेदी करण्यासाठी जात आहेत. वयाच्या 90 वर्षे ओलांडूनही ते त्यांच्या बायकोचा हट्ट पूर्ण करत असल्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच अभिनेत्री रविना टंडन यांनी देखील तो त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला.

सोशल मीडियावर गाजणारा हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुरा पोलिस स्टेशनसमोर असलेल्या गोपिका ज्वेलरी शॉपचा आहे. आपल्या पत्नीला आवडणारे दागिने खरेदी करण्यासाठी आजोबा त्यांना गोपिका ज्वेलरी शॉपमध्ये आणतात. 93 वर्षांच्या आजोबांनी त्यांच्या पत्नीसाठी एक हार आणि ब्रेसलेट पसंत केले होते. आजीला हे दोन्ही दागिने खूप आवडले. त्यामुळे हे दागिने खरेदी करण्यासाठी गोपिका ज्वेलरी शॉपच्या मालकाला पैसे दिले. मात्र तेव्हा त्यांच्याकडे फक्त 1200 रुपये होते. आजी ज्वेलरी शॉपच्या मालकाला विचारतात, 'याचे पैसे किती होतील?' त्यावर मालक विचारतो, 'तुमच्याकडे किती पैसे आहेत?' तेव्हा ते 1200 रुपये दाखवतात. मग आजोबा त्यांच्या पिशवीतून सुट्टे पैसे काढतात आणि दुकानाच्या मालकाला सांगतात, 'आपल्याकडे अजून पैसे आहेत'.
यावर गोपिका ज्वेलरी शॉपचे मालक म्हणतात, 'मी इतके पैसे घेणार नाही, मला कमी पैसे द्या'. मग आजी-आजोबा त्यांना हजार रुपये देतात. दुकान मालकही तेवढे पैसे घेत नाही. त्यावेळी आजी-आजोबा म्हणतात, 'पाचशे रुपयांची नोट घ्या'. पण शेवटी मालक सर्व पैसे परत करतो आणि दोघांकडून प्रत्येकी फक्त 10 रुपये घेतो. 'हा पांडुरंगचा आशीर्वाद आहे. इतके पैसे खूप झाले. हे पैसे मी जपून ठेवेल', असं म्हणत गोपिका ज्वेलरी शॉपचे मालक फक्त 20 रुपये घेतात. तेव्हा आजी आणि आजोबांना अश्रू अनावर होतात. नंतर दोघेही अश्रू पुसतात आणि गोपिका ज्वेलरी शॉपच्या मालकाला आशीर्वाद देतात. आजी-आजोबांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या या दागिन्यांच्या दुकानाच्या मालकाचे सध्या कौतुक होत आहे.