निफाड : निफाड तालुक्यातील देवगावातून अंगणवाडीच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पोषण आहाराबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बालकांना वितरित करण्यात आलेल्या बंद पोषण आहाराच्या पाकिटात चक्क कुजलेला मृत पक्षी आढळल्याचा आरोप लाभार्थी कुटुंबाने केला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित आहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निफाड तालुक्यातील देवगाव बिट क्रमांक दोनमधील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रातून वितरित करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत पक्षी आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सुकदेव सदाशिव माळी यांच्या मुलांना अंगणवाडीमार्फत घरपोच पोषण आहाराचे पाकीट देण्यात आले होते. हे बंद पाकीट उघडताच त्यामध्ये कुजलेला मृत पक्षी आढळल्याचे माळी कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यातील एक पाकीट आहार संबंधित कुटुंबाने शिजवला देखील व मुलांनी देखील खाल्ला होता. दुसरे पाकीट फोडल्यानंतर त्यात मृत पक्षी आढळला, असे लाभार्थी पूजा सुकदेव माळी यांनी म्हटले आहे. तर या धक्कादायक प्रकाराची माहिती तातडीने संबंधित अंगणवाडी सेविका आणि अधिकाऱ्यांना देण्यात आली असून यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी या घटनास्थळी येऊन संबंधित पोषण आहाराचे पॉकेटे ताब्यात घेतले आहे. ते तपासणी करता पाठवण्यात आले आहे. तसेच संबंधित पोषण आहाराचा साठा जप्त करून त्याची प्रयोगशाळेत तपासणी करावी, उत्पादन संस्था आणि पुरवठादारासह संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी ग्रामस्थ प्रशांत कुलकर्णी यांनी केली आहे.
लहान बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेवरच या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.