मालेगाव : नाशिकच्या मालेगावमध्ये कलेक्टर पट्टा भागात घराचा स्लॅब कोसळून 80 वर्षीय आजी आणि 20 वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. विमलबाई पंढरीनाथ येवले आणि चेतन रामचंद्र येवले असे ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झालेल्या आजी आणि नातवाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, सततच्या पावसामुळे जुन्या व जीर्ण घरांबाबत नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याबाबत येथील स्थानिक नगरसेवक मदन बापू गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
घटना दुपारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास घडली. घरात एकूण पाच जण राहत होते. घटनेची महाइति मिळताच अग्निशमन दल, स्थानिक प्रशासन आणि परिसरातील नागरिकांना तातडीने मदतकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर कुटुंबीयांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र आजी आणि नातवाला वाचवता आले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.