सावजीवरून केलेल्या वक्तव्यामुळे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा नव्या वादात सापडले आहेत. अमरावतीतील एका कार्यक्रमात “नागपूरचं सावजी खाल्लं तर एका महिन्यात हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, अशी परिस्थिती आहे,” असे वक्तव्य त्यांनी केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विदर्भात संताप व्यक्त होत आहे. सावजीप्रेमी आणि व्यावसायिकांनी हे वक्तव्य सावजी खाद्यसंस्कृतीची बदनामी करणारे असल्याचा आरोप केला आहे. सावजी ही केवळ तिखट मटणाची डिश नसून विदर्भाच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग असल्याचे सांगत व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ज्या विभागात तुकाराम मुंढे जातात, त्या विभागात कारवाया आणि वाद हे समीकरण ठरलेलेच असते. अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते सातत्याने चर्चेत आहेत. मात्र अमरावतीतील कार्यक्रमात त्यांनी सावजीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. “नागपूरचं सावजी खाल्लं तर एका महिन्यात हॉस्पिटलमध्ये जावं लागेल,” या वक्तव्यावरून सावजीप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
मुंढे यांच्या वक्तव्यामुळे सावजी खाद्यसंस्कृतीबाबत गैरसमज पसरवत असल्याची भावना सावजी व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- Dabur Products Ban: डाबरच्या अनेक उत्पादनांवर FSSAI ची बंदी; मोठं कारण आलं समोर
सावजी ही विदर्भाच्या खाद्यसंस्कृतीची ओळख असून अशा वक्तव्यामुळे ग्राहकांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.सावजी म्हणजे केवळ तिखट मटण नव्हे, तर अनेक पिढ्यांपासून जपली गेलेली विदर्भाची खाद्यपरंपरा आहे. या वक्तव्यामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याची खंतही अनेक व्यावसायिकांनी व्यक्त केली. अनेक ग्राहक वर्षानुवर्षे सावजी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सावजी व्यावसायिकांनी म्हटलं की, “सावजी म्हणजे फक्त तिखट आणि तेलकट अन्न असा समज पूर्णपणे चुकीचा आहे. पारंपरिक सावजी बनवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. मसाले आधी व्यवस्थित भाजले जातात, त्यानंतर गरम पाण्यात उकळून पाटा-वरवंट्यावर वाटले जातात. त्यामुळे मसाला संतुलित आणि चवीला वेगळा तयार होतो. अशा पद्धतीने बनवलेले सावजी खाल्ल्याने जळजळ किंवा पोटाचा त्रास होत नाही. आजकाल जास्त तेल आणि तिखट वापरून त्यालाच सावजी म्हटले जाते, त्यामुळे सावजीबाबत गैरसमज पसरत आहेत. सावजी ही एक समृद्ध खाद्यसंस्कृती असून तिची पारंपरिक चव आणि पद्धत जपणे गरजेचे आहे. सावजी म्हणजे केवळ तिखट नव्हे, तर मसाल्याचे योग्य संतुलन आणि पारंपरिक पाककलेचा उत्कृष्ट नमुना आहे.”