CRS Portal Scam : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जन्म नोंदणी प्रणालीमध्ये (CRS Portal) झालेल्या एका महाघोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 या अवघ्या 2 महिन्यांच्या कालावधीत 1 लाखांहून अधिक बनावट जन्म दाखले तयार करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. हा केवळ प्रशासकीय भ्रष्टाचार नसून राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. हा घोटाळा करण्यासाठी केंद्राच्या CRS पोर्टलवर सायबर हल्ला करून डेटाशी छेडछाड करण्यात आली आहे.
लोकसंख्या 1500 आणि नोंदणी 27,000
सोमय्या यांनी या घोटाळ्याची धक्कादायक आकडेवारी मांडताना सांगितले की, जळगाव, यवतमाळ आणि उत्तर प्रदेशातील काही गावांमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. ज्या गावांची लोकसंख्या केवळ 1,000 ते 1,500 आहे, तिथे चक्क 10,000 ते 27,000 जन्म दाखले नोंदवले गेले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये नोंदणी झालेल्या 99 टक्के व्यक्तींचे वय हे 20 ते 60 वर्षांच्या दरम्यान आहे. महाराष्ट्रातील जळगाव, पारोळा, यवतमाळसह उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अलीगडमध्येही या बनावट नोंदी आढळल्या आहेत.
हेही वाचा - Mayor Reservation 2026 : श्रीमंत महापालिकेची चावी महिलांच्या हाती! जाणून घ्या कोणकोणत्या महानगरपालिकेवर महिलाराज
आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश आणि अटक
या मोठ्या रॅकेटप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार अवधेश कुमार दुबे याने कॉम्प्युटरच्या मदतीने ही सर्व फेरफार केल्याचे समोर आले आहे. या संदर्भात सोमय्या यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली असून, लवकरच ते दिल्लीतही हा विषय केंद्र सरकारकडे मांडणार आहेत. बनावट दाखल्यांच्या माध्यमातून घुसखोरांचे उदात्तीकरण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मुंबईत बांगलादेशी फेरीवाल्यांविरुद्ध मोहीम
बनावट दाखल्यांच्या या विषयाला सोमय्या यांनी मुंबईतील अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांशी जोडले आहे. हजारो बांगलादेशींनी मुंबईचे रस्ते अडवले असून त्यांच्याकडे कोणतेही कायदेशीर परवाने नसल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांच्या मदतीने या बांगलादेशींविरुद्ध तीव्र मोहीम सुरू करण्यात आली असून, मुलुंड रेल्वे स्टेशन परिसर या मोहिमेअंतर्गत नुकताच रिकामा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
यावेळी सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर जोरदार निशाणा साधला. जिथे 100 टक्के मुस्लिम भाग आहे तिथे मतदारांनी MIM ला पसंती दिली, मात्र जिथे 15 ते 20 टक्के मुस्लिम मतदार होते, तिथे त्यांनी उद्धव ठाकरेंना मतदान केले, असे ते म्हणाले. बांगलादेशींना व्होटबँक म्हणून वापरणारे नेतेच या कारवाईत अडथळे आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, मुंबईला 'हिरवं' करण्याची भाषा करणाऱ्यांना 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप चोख उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.