1 मे रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ आणि तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नसरापूर येथे एका 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली या घटनेने संपूर्ण राज्य हादरला आहे. काल 2 मे रोजी रात्री उशीरा या चिमुरडीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी पुण्याच्या नवले पुलावर आणि पुणे-बंगळुरू महामार्गावर ठिय्या मांडला. जोपर्यंत न्याय मिळत नाही, आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका चिमुरडीच्या नातेवाईकांनी घेतली.
त्यानंतर आता या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आज भोर आणि राजगड तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. सर्व व्यापारी संघटना, दुकानदार आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत या बंदचे आवाहन केले होते, ज्याला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले आहेत. या नराधम आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा व्हावी, ही एकच मागणी केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट असून आरोपीला कठोर शिक्षा होईपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणातील आरोपी भीमाजी कांबळे सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असून आरोपींना कठोर शिक्षा करणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. त्यामुळे या प्रकरणात सरकार आणि न्यायव्यवस्था काय भूमिका घेतं हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.