गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेले असताना आता एका मुलीचा छेड काढल्याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या दोन मुलींपैकी खुलेआम एका मुलीची छेड काढत तरुण पसार झाला. दुचाकीस्वाराने पाठीमागून येत मुलीच्या अंगाला स्पर्श केला आणि तिच्या गळ्यातील आयडीकार्ड अर्थातच ओळखपत्र घेऊन दुचाकीने पळाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. अकोला शहरातील कोचिंग क्लासेस म्हणून प्रसिद्ध असलेला परिसर जवाहर नगर परिसरात ही घटना घडली आहे. शहरासह ग्रामीण भागातून मुली शिकवणी वर्गासाठी या परिसरात येत असतात, अनेकदा या ठिकाणी मुलींचा छेड झाल्यासारख्या घटनाही घडल्या आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दामिनी पथकाची गस्ती वाढवावी, अशी मागणी नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी केली आहे.