Teacher Strike: महाराष्ट्र सरकारने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सर्व शिक्षकांसाठी सक्तीची केल्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक झाले आहेत. या निर्णयाचा निषेध म्हणून 5 डिसेंबर रोजी राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारी, खाजगी तसेच अनुदानित शाळांमध्ये मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता असून या बंदमुळे लाखो विद्यार्थ्यांचे अध्यापन थांबणार आहे.
राज्यव्यापी बंदला मोठा पाठिंबा
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था महामंडळ, शिक्षक सेना, शिक्षक भारती, मुंबई मराठी अध्यापक संघ यांसारख्या प्रमुख संघटनांनी एकत्र येत या बंदमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे. शिक्षक सेनेचे राज्य कार्याध्यक्ष जालंधर सरोदे म्हणाले, 'दशकानुदशके सेवा देणाऱ्या अनुभवी शिक्षकांना आता नोकरी असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. टीईटी सक्ती आणि गट मान्यता नियमांमुळे हजारो शिक्षकांचे रोजगार धोक्यात आले आहेत.'
हेही वाचा - Maharashtra Weather: महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; पुढील 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे, IMD कडून अलर्ट जारी
टीईटी सक्तीमुळे रोष का?
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 53 वर्षांखालील प्रत्येक शिक्षकाने टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षकांचा आक्षेप असा की, अत्याधिक ऑनलाइन रिपोर्टिंग, गैर-शैक्षणिक जबाबदाऱ्या, निवडणूक व इतर सरकारी कामे यामुळे अध्यापनासाठी आवश्यक वेळच उरत नाही, आणि आता टीईटीचा अतिरिक्त ताण लादून शिक्षकांना अस्थिर केले जात आहे, असा आरोप संघटनांनी केला आहे.
शिक्षकांच्या प्रमुख मागण्या
2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटीमधून सूट
गट मान्यता (GR) नियम रद्द करणे
शिक्षकांवरील गैर-शैक्षणिक कामांचा ताण कमी करणे
शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी लागू करणे
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तत्काळ भरती
अल्पसंख्याक शाळांना गट मान्यतेत विशेष सवलत
शिक्षणातील कंत्राटीकरणाला पूर्णविराम
सुधारित खात्रीशीर प्रगती योजना (ACP) अंमलात आणणे
हेही वाचा - Digital Satbara: डिजिटल सातबारा उताऱ्यासाठी ऐतिहासिक पाऊल! महायुती सरकारचे परिपत्रक जाहीर
सरकारकडून प्रतिसादाची प्रतीक्षा
शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी हा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला असल्याचे सांगितले. परंतु शिक्षक संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की सरकारने लिखित निर्णय घेतला नाही, तर 10 डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनात मोठे आंदोलन उभारले जाईल. तथापी, शिक्षण भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले की, सरकारनेच परिस्थिती गंभीर केली आहे. आम्ही शांततापूर्ण पण ठाम आंदोलन करण्यास तयार आहोत.