नवी दिल्ली : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसच्या गोटातूनही नाराजीचे सूर उमटत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बैठकीला 6 खासदारांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीत खासदारांनी प्रणिती शिंदेंवर नाराजी व्यक्त केल्याचेही समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बैठकीला 6 खासदारांनी दांडी मारली. दिल्लीत झालेल्या बैठकीत 16 पैकी 10 खासदारांची उपस्थिती होती. काही खासदारांनी प्रणिती शिंदे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत महाराष्ट्रातील खासदारांची जबाबदारी प्रणिती शिंदेंवर दिल्याने नाराजीचा सूर उमटल्याचे बोलले जात आहे. खासदारांपर्यंत सूचना आणि माहिती पोहोचत नसल्याची तक्रार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हर्षवर्धन सपकाळांच्या बैठकीला 16 पैकी 10 खासदार उपस्थित होते. तर 6 खासदारांनी दांडी मारली होती. या बैठकीत अजेंडा सांगितला गेला. कामकाज कसं चालतं आणि मतदारसंघातील मुद्दे, यावर ही चर्चा झाली. या बैठकीत प्रणिती शिंदे यांच्याविरोधात तक्रारीचा पाढा मांडल्याचे समोर आलं आहे. खासदारांनी जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तांवरून गंभीर प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रातील खासदारांच्या समन्वयाची जबाबादारी प्रणिती शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडून समन्वय साधला जात नाही, अशी खंत खासदारांनी व्यक्त केली. पक्षातील मुद्दे , सूचनांची माहिती मिळत नसल्याची तक्रार खासदारांनी प्रदेशाध्यक्षांकडे मांडली.