स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 22 जून रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत. याचपार्श्वभूमिवर अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांनंतर 17 जागांसाठी भाजप सर्वाधिक 11 जागांवर उमेदवार देणार असून शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत. तर विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून भारतीय जनता पक्षाकडून 11 नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
पक्षप्रवेश होताच तनपुरेंना लॉट्री
दरम्यान यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही तासांत भाजपने त्यांना अहिल्यानगरमधून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांना पाठिंबा देणाऱ्या तनपुरेंची या पक्षप्रवेशामुळे विधानपरिषदेची जागा निश्चित झाली आहे.
सुप्रिया सुळे यांच्या व्याहींना भाजपकडून संधी
सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणी यांना देखील भाजपने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. लखानी यांचे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असल्याने त्यांनाच या ठिकाणहून उतरविण्याचा निर्णय भाजपने घेतलेला आहे. त्यामुळे वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून अरुण लखानी यांची उमेदवारीसाठी वर्णी लागल्याचे पाहायला मिळाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जात असून या दोघांच्या मध्यस्थीनेच रेवती-सारंगचे लग्न जुळल्याची माहिती आहे. दरम्यान सुप्रिया यांच्या कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार असून सारंग अरुण लखानी यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहेत. अरुण लखाणी हे सुप्रिया सुळेंचे व्याही असून ते भाजपमधून विधान परिषदेची निवडणूक लढणार आहेत.
सोलापूरमध्ये राजेंद्र राऊतांना उमेदवारी जाहीर होताच राजकीय चर्चांना उधाण
सोलापूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघासाठी भाजपकडून माजी आमदार राजेंद्र राऊत यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अनेक दिग्गज इच्छुकांमध्ये चुरस असताना अखेर पक्षश्रेष्ठींची राऊत यांच्या नावावर मोहोर लागली आहे. बार्शीसह जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्यात राऊत यांची महत्त्वाची भूमिका आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील कामगिरीची पक्षाने दखल घेत राजेंद्र राऊत यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना संधी न मिळाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
भारतीय जनता पक्षा कडून विधान परिषद उमेदवारी यादी जाहीर
वर्धा- अरूण लखानी
भंडारा गोंदिया- अविनाश ब्राम्हणकर
अमरावती- प्रवीण पाटील
सांगली – सातारा – धैर्यशील कदम
सोलापूर- राजेंद्र राऊत
अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे
संभाजीनगर – सुहास शिरसाट
नांदेड- अमर राजूरकर
धाराशीव लातूर बीड – बसवराज पाटील
जळगांव – नंदकिशोर महाजन
विधान परिषद पोट निवडणूकः
नागपूर – डॅा राजीव पोतदार