Iran-Israel War: पश्चिम आशियातील इराण आणि इस्रायल यांच्यात भडकलेल्या युद्धाचा थेट फटका जळगावसह खान्देशातील प्रवाशांना बसला आहे. एका खाजगी कंपनीच्या कार्यक्रमासाठी दुबईला गेलेले खान्देशातील 80 लोक सध्या तिथेच अडकून पडले असून, यात जळगाव शहरातील 31 जणांचा समावेश आहे. युद्धामुळे हवाई क्षेत्र (Airspace) बंद करण्यात आल्याने या प्रवाशांच्या परतीचा मार्ग खुंटला असून मायदेशी असलेल्या त्यांच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे.
नेमकी परिस्थिती काय?
दरम्यान, गेल्या शुक्रवारी एका विमा कंपनीच्या कार्यक्रमासाठी खान्देशातून 80 जण दुबईला रवाना झाले होते. यामध्ये शिरपूर, रावेर, पाचोरा आणि चाळीसगावमधील लोकांचा समावेश आहे. नियोजित वेळापत्रकानुसार, आज 2 मार्च रोजी रात्री 9:15 च्या विमानाने हे सर्वजण भारतात परतणार होते. मात्र, युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमान उड्डाणे रद्द झाल्याने या सर्वांचा मुक्काम आता सक्तीने वाढला आहे.
नातेवाईकांची जीवाची घालमेल
जळगावमधील अनेक कुटुंबातील सदस्य कोणाचे पती, वडील तर कोणाचे भाऊ सध्या दुबईत आहेत. दुबईत सामान्य व्हॉट्सॲप कॉलिंग चालत नसल्याने संपर्कासाठी पालकांना कसरत करावी लागत आहे. वेगळी ॲप्स डाऊनलोड करून संदेशांची देवाणघेवाण सुरू आहे. तसेच, जळगावमधील अनेक तरुण-तरुणी नोकरीनिमित्त तिथे स्थायिक आहेत, त्यांच्या सुरक्षेबाबतही पालकांच्या मनात धडकी भरली आहे.
हेही वाचा - Aramco Refinery Attack: सौदी अरेबियाच्या अरामको रिफायनरीवर भीषण ड्रोन हल्ला; कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ
'रस्त्यावर स्मशान शांतता'; अडकलेल्या प्रवाशाची आपबिती
दुबईत अडकलेले जळगावचे रहिवासी दुर्गेश चौधरी यांनी तेथील परिस्थितीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, "आम्ही सध्या दुबई फेस्टिवल सिटीमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आहोत. युद्धाचा परिणाम इथल्या वातावरणावर स्पष्टपणे जाणवत आहे. ज्या ठिकाणी हल्ल्यांची शक्यता किंवा चर्चा आहे, तिथून आम्ही 50-60 किमी अंतरावर आहोत. विमानतळ आणि हवाई क्षेत्र बंद असल्याने आम्ही बाहेर पडू शकत नाही. बाहेर रस्त्यांवर सध्या स्मशान शांतता पसरली आहे." सध्या या प्रवाशांकडे वाट पाहण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. केंद्र सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून भारतीयांना सुखरूप बाहेर काढावे, अशी मागणी आता पालकांकडून केली जात आहे.