धाराशिव: राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे, अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी उदास झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पूरबाधीत शेतकऱ्यांसाठी मंगळवारी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 31.64 शेतकऱ्यांसाठी 2 हजार 215 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली.
बुधवारी पुरग्रस्त गावांची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दौऱ्यावर होते. नुकताच, उपमुख्यमंत्री अजित पवार धाराशिव येथे पूरग्रस्त गावांची पाहणी करण्यासाठी आले होते. यादरम्यान, अजित पवार पूरग्रस्तांना मार्गदर्शन करत होते. तेव्हा, अचानक एका शेतकऱ्याने अजित पवारांना कर्जमाफीबाबत प्रश्न विचारले. यावर अजित पवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
अजित पवार काय म्हणाले?
‘आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलो आहोत का?. अरे बाळा सकाळी सहा वाजल्यापासून पूरग्रस्त गावांची पाहणी करत आहे, एवढं जीव तोडून सांगत आहे. आम्ही लाडक्या बहिणींना मदत करत आहोत. आज 45 हजार कोटी रुपये वर्षाला त्यांना मदत करतो. शेतकऱ्यांची वीज माफी केली’, अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.
मराठवाड्यासह इतर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे जीवन विस्खळीत झाले आहेत. यासह, शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. 21 सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यात 23 लाख 414 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्यात अचानक अतिवृष्टी का झाली? याबाबतची माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘हवामानात बदल झाल्यामुळे मराठवाड्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली. गेल्या दहा ते पंधरा वर्षांत मराठवाड्याला दुष्काळ, गारपीट आणि अतिवृष्टी अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यावर, जागतिक बँकेने दिलेले सहा हजार कोटी हवामान बदलाचा परिणाम न होणाऱ्या शेतीवर काम करण्यासाठी खर्च करू’.